…तर पर्यटन व्यावसायिकांना आत्महत्या कराव्या लागतील

विकेंड लाॅकडाऊनच्या शंकेने पर्यटन व्यावसायिक अस्वस्थ

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

राज्य सरकार लवकरच विकेंड लाॅकडाऊन जाहीर करणार आहे. या विकेंड लाॅकडाऊनचा सर्वात जास्त फटका पर्यटन व्यावसायिकांना बसणार आहे. यापूर्वीच्या दोन लाॅकडाऊनमध्ये पर्यटन व्यावसायिकांना कोणत्याही सवलती मिळाल्या नसल्यामुळे ते आधीच कर्जबाजारी झाले आहेत, त्यात विकेंड लाकडाऊन झाल्यास आमच्यापुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असा सूर पर्यटन व्यावसायिकांमधून उमटत आहे.
अलिबाग तालुक्यात मांडवा ते रेवदंड्यापर्यंत काॅटेज, रिसाॅर्ट, हाॅलिडे होमच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होते. परंतु गेली दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आता राज्य सरकार विकेंड लाॅकडाऊन लावणार असल्यामुळे पर्यटन व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
पर्यटन व्यवसाय हा प्रामुख्याने शनिवार-रविवार असे दोन दिवस चालतो, तोच विकेंड लाॅकडाऊनच्या नावावर बंद ठेवला तर आम्ही आणि आमच्या व्यवसायावर असलेल्यांनी जगावे कसे असा प्रश्न अलिबाग पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष, सृष्टी फार्म, थळचे संचालक मनोज घरत यांनी केला आहे. तर कोरोना शनिवार-रविवारच येतो का? असा प्रश्न उपाध्यक्ष धोकवड्याच्या माय फार्मच्या संचालिका मानसी चेऊलकर यांनी सरकारला केला आहे. विकेंड लाॅकडाऊनच्या नावावर पर्यटन व्यवसाय बंद केला जातोय, तसे नसेल तर दोन डोस घेतलेल्या पर्यटकांना शनिवार-रविवार पर्यटनाची परवानगी दिली जावी, अशी प्रतिक्रिया आवासच्या शिवांजली हाॅलिडे होमचे अमिष शिरगावकर यांनी दिली.
आम्हाला शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस ५० टक्के क्षमतेने पर्यटन व्यवसाय करण्याची परवानगी दिली जावी. उर्वरित ५ दिवस आम्हाला व्यवसाय बंद ठेवण्यास सांगितला तरी हरकत नाही, अशी प्रतिक्रिया आगरसुरेच्या यलो हाऊसचे संचालक सुबोध राऊत यांनी दिली. रिसॉर्ट, कॉटेज, हॉलिडे होममुळे कोरोना पसरला आहे असा कोणताही पुरावा सरकारकडे नसताना पर्यटन व्यवसायावर विकेंड लॉकडाऊन सरकार लादत असल्याचा आरोप झिराड येथील ड्रीमलँड रिसॉर्टचे संचालक अँड. शेखर पांडव यांनी केला.
तसेच मोठ्या लोकांच्या बंगल्यामधून अनधिकृत चालणारा पर्यटन व्यवसाय कायम सुरू असतो त्याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देत नाही, मात्र अधिकृतरित्या पर्यटन व्यवसाय करणाऱ्या आम्हा पर्यटन व्यावसायिकांवर बंधने लादली जातात. सरकारने विकेंड लाॅकडाऊनच्या परिघातून पर्यटन व्यावसायिकांना काढले तरच पर्यटन क्षेत्र मजबूत होईल आणि पर्यटन क्षेत्रातून निर्माण होणारा रोजगार वाचेल असा सूर पर्यटन व्यावसायिकांतून उमटतो आहे.

Exit mobile version