काष्टकलेच्या माध्यमातून पर्यटनवृद्धी

नागावच्या अतुल गुरव यांचा उपक्रम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नागाव येथील अतुल गुरव या तरुणाने आपल्या काष्ट कलेच्या छंदाचा व्यवसायात रुपांतर करुन पर्यटकांना आकर्षित करीत नागावचा समुद्र किनारा देखील स्वच्छ ठेवण्यासही हातभार लावला आहे.
अतुल हेमंत गुरव याने नागाव बंदर येथेच राहून काष्ट कलेसारखी चांगली कला आत्मसात केली आहे. टाकावू पासून टिकावू वस्तू तयार करण्याचा त्याला छंद आहे. नारळाच्या करवंटी पासून शोभिवंत वस्तू तसेच समुद्र किनारी वाहून येणार्‍या झाडांचे खोड, मुळांपासून प्राणी, पक्षी आणि इतर वस्तू तो तयार करतो. विशेष म्हणजे त्यांनी तसेच लाकडापासून शोभिवंत राख्या सुद्धा तयार केल्या आहेत. नागाव समुद्रकिनारी वाहून आलेल्या विविध प्रकारच्या बाटल्या, स्लिपर या सगळ्या गोळा करुन त्यापासून तो शोभिंवत वस्तू बनवतो. याप्रकारामुळे नागावचा समुद्रकिनारा स्वच्छ होण्यासही मदत होते. सुरुवातीला याकडे छंद म्हणून पाहणार्‍या अतुलने सात वर्षे तो जोपासला. त्यावेळी सोशल मिडिया तसेच नागाव समुद्रकिनार्‍यावर येणारे पर्यटक यांच्याकडून या कलेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे या छंदाचे व्यवसायात रुपांतर करण्याचा त्याने निर्णय घेतला. विशेष म्हणजे या सगळ्या कलेसाठी त्याने कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. या छंदाचे व्यवसायात रुपांतर करण्यासाठी मोठया मशिनरी व साहित्यांची गरज होती. त्यासाठी दिलीप कामतीकर यांनी सहकार्य केले. यामुळे आपल्या व्यवसायवाढीस मोलाचा वाटा मिळाल्याचे तो आवर्जून नमुद करतो. त्याचप्रमाणे आपल्या कुटूंबातील व्यक्ती आणि मित्रमंडळींचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. अतुल गुरव यांना 9764344192 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

अतुल गुरव याने शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची नुकतीच भेट घेतली. त्याची कला पाहून चित्रलेखा पाटील यांनी आनंद व्यक्त केला. अतुल गुरवच्या कलेबद्दल सार्थ अभिमान व्यक्त करतानाच चित्रलेखा पाटील यांनी आजच्या तरुण पिढीला सल्ला देत जोखीम किंवा अपयशाची भिती बाळगु नका. उद्योजक बना, अपयश हे यशाचे प्रथम पाऊल आहे. जोखीम घ्या आणि आपले स्वप्न हसत हसत हस्तगत करा असा संदेश दिला.

Exit mobile version