| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड जंजिरा, काशिद बिच पर्यटनात चिकणी फॅमिली बिच पर्यटकांचे आकर्षण ठरले असून, दिवाळीच्या सुट्टीत समुद्रसफरीचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी विकेंडला या बिचवर पर्यटकांची रेलचेल दिसून आली.
काशिद समुद्रकिनार्यापासून काही अंतरावर पांडवकालीन प्रसिद्ध कावड्याच्या डोंगर सान्निध्यात असलेल्या या चिकणी फॅमिली बीचवर भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणार्या लाटा, किनार्यावरील शुभ्र वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांच्या सोयी-सुविधात याठिकाणी असलेली स्पीडबोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते. याचा पर्यटक मनसोक्त आनंद लुटत होते.
याठिकाणी विविध खाद्यपेय, चहा-नाश्त्याच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रॅफिक जामलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटकदेखील आवर्जून भेट देत असतात. यामुळे काशिद बीच पर्यटनात आता चिकणी फॅमिली बिच ला खील अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.