9 नोव्हेंबरला रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन
| महाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ ते इंदापूर या अंतरात रस्त्याची झालेली दुरवस्था आणि त्याकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष याविरोधात रायगड प्रेस क्लबच्या वतीने 9 नोव्हेंबर रोजी कोलाड येथे मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षी होणारा रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन पोलादपूरमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
रायगड प्रेस क्लबच्या कार्यकारिणीची बैठक पोलादपूर येथील हॉटेल बालाजी येथे संपन्न झाली. त्यावेळी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पोलादपूर प्रेस क्लबच्या संयोजनांतर्गत घेण्यात आलेल्या या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, कार्याध्यक्ष मनोज खांबे, उपाध्यक्ष प्रशांत गोपाळे, मोहन जाधव, सरचिटणीस शशिकांत मोरे, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे, सदस्य अनिल मोरे, महेश पवार, पद्माकर उभारे, गौतम जाधव, पोलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रकाश कदम यांच्यासह पोलादपूर प्रेस क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होेते.
न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीचे व्हिडीओ जर्नालिस्ट, महाडचे सुपुत्र संदीप मोरे यांचे निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी देण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत कोलाड येथे रायगड प्रेस क्लबच्या वतीने 9 नोव्हेंबर रोजी कोलाड येथे मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार असल्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील वर्षी रायगड प्रेस क्लबचा 17 वा वर्धापन दिन पोलादपूर येथे पोलादपूर प्रेस क्लबच्या संयोजनाखाली होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
19 आणि 20 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे होणार्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला प्रत्येक तालुका प्रेस क्लबच्या वतीने किमान पाच सदस्य उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच रायगड प्रेस क्लबच्या कार्यकारिणी सदस्यांचा प्रत्येक तालुक्यात संवाद दौरा करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
ही बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीच्या सुरुवातीस पोलादपूर प्रेस क्लबच्या वतीने रायगड प्रेस क्लबच्या पदाधिकार्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.