राफ्टिंग कंपनीच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील धगडवाडी गावच्या हद्दीत कुंडलिका नदीपात्रात राफ्टिंग करत असताना बोट पाण्यातील झाडाला अडकून कलंडल्याने मुंबईतील एका तरुण पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना 11 जुलै रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. महिना उलटूनही याप्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या तपासकार्यावर तरुणाच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला होता. दरम्यान, या प्रकरणात पर्यटनावेळी कर्तव्यात कसूर आणि जबाबदारीत हलगर्जीपणा केल्यामुळे कोलाड पोलिसांनी बोटिंग कंपनीतील गार्ड आणि जीव रक्षक या दोन कामगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहा तालुक्यातील धगडवाडी येथे कुंडलिका नदीत बोटीतून राफ्टिंग करीत असताना बोट पाण्यातील झाडाला अडकून कलंडली. यावेळी बोटीतील दोरी मयत तरुण पर्यटक मनोज कुमार अमर नाथ यांच्या पायात अडकली. त्यामुळे सदर तरुण पाण्यात पडून बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कोलाड पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर बोटिंग कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या आणि कंपनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलाला जीव गमावावा लागला. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करून आम्हला न्याय द्यावा, अशी मागणी मृत तरुणाची आई जानकी देवी अमर सिंह नाथ यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती.
या लेखी पत्रानंतर शासकीय यंत्रणा खऱ्या अर्थाने कामाला लागली. महिनाभरानंतर कोलाड पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवली व घटनेत दोषी असणाऱ्या गणपती बच्चनसिंह रावत (28, रा. रॉकहिल्स रिसॉर्ट, मूळ रा. उत्तरखंड) गाईड व राजू रामबाहादूर परियार (43, रॉक हिल्स रिसॉर्ट, मूळ राहणार नेपाळ (जीवरक्षक) या कामगारांविरोधात कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही त्यांना अटक झालेली नाही. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत फारने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भोजकर करीत आहेत. गुन्हा दाखल व्हायला एक महिना का लागला, असा सवाल मृत तरुणाच्या कुटुंबियांनी व्यक्त केला असून, आमच्या मुलाला न्याय मिळायला हवा, अशी मागणी केली आहे. कुटुंबियांनी कोलाड पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला असून, याबाबत लवकरच पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.
