| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारी पुणे येथील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तनिष्क मल्होत्रा (20) रा. बावधन, जि. पुणे असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तनिष्क आपल्या चार मित्रां बरोबर काशीद बीचवर फिरण्यासाठी आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या काशीद येथील सर्व सेवा व पर्यटक यांना सेवा देणाऱ्या सर्व टपऱ्या बंद आहेत. समुद्र किनारी सर्व सेवा बंद असताना पदवीधरच्या शेवटच्या वर्षात शिकत असणारी ही चार मुले समुद्रात पोहण्याची इच्छा निर्माण झाल्याने दुपारच्या दरम्यान पाण्यात पोहण्यास गेली असता. खवळेला समुद्र व खोल पाण्याचा अंदाज न आल्याने यातील तनिष्क मल्होत्रा या तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या बाबत मुरुड पोलिस ठाण्यात याची रीतसर नोंद करण्यात आली आहे. या बाबत काशीद सरपंच संतोष राणे यांनी सांगितले की, सध्या पावसाळी हंगाम असल्याने हा किनारा बंद ठेवण्यात आला आहे. परंतु, काही उत्साही पर्यटक कोणालाही न जुमानता थेट समुद्रात उतरत आहेत. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. पावसाळी हंगाम असल्याने समुद्रात पोहण्यास जाऊ नये असे आवहन करण्यात आले आहे.







