पर्यटन हंगाम जोरात

चार महिन्यांत एक लाख पर्यटकांची माथेरानला भेट

| माथेरान | वार्ताहर |

माथेरान पर्यटनस्थळाला मागील चार महिन्यांत एक लाख 77 हजार पर्यटकांनी पसंती दिल्याने माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या तिजोरीत सुमारे 93 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानला पर्यटकांची चांगली पसंती मिळत असून, मागील चार महिन्यांत लाखाच्या वर पर्यटकांनी माथेरानला भेट दिली आहे. येथील आल्हाददायक हवा, निसर्गसौंदर्य, गर्द हिरवीगार वनराई, लाल मातीच्या रस्त्यावरून रुबाबदार घोड्यावर बसून केलेली रपेट यामुळे हे पर्यटनस्थळ पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. या पर्यटनस्थळाची ख्याती सर्वदूर पसरलेली असल्याचे चित्र आजही येथे दिसत आहे.

मुंबई-पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर अनेक जण माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात. येथील उन्हाळ्याच्या सुट्टीत माथेरान पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाते. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या काळात सुमारे एक लाख 77 हजार पर्यटकांनी माथेरानला भेट दिली. येथील माथेरानची राणी अर्थात मिनी टॉय ट्रेनलाही पर्यटक मोठ्या प्रमाणावर पसंती देत असल्याचे चित्र आहे. तसेच माथेरान पर्यटनस्थळी ई-रिक्षा सेवादेखील सुरू करण्यात आली आहे. या ई-रिक्षा सेवेचा येथे ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होताना दिसत आहे. मिनीट्रेन आणि ई-रिक्षामुळे येणार्‍या पर्यटकांचा प्रवास येथे सोयीस्कर होत आहे. दरम्यान, मे महिन्यात पर्यटक संख्येत अजून वाढ होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते आहे. माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेकडून मुख्य प्रवेशद्वारी हिरकणी कक्ष तसेच मोफत वायफाय सुविधा दिली जात आहे.

माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्यावतीने पर्यटकांसाठी विविध योजना राबविल्या गेल्या आहेत. पर्यटकांच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने प्रशासन कार्यरत आहे. त्यामुळे आत्ता पर्यटकांचा ओढा या पर्यटनस्थळी दिवसेंदिवस वाढत आहे.

राहुल इंगळे,
मुख्याधिकारी तथा प्रशासक,
माथेरान गिरीस्थान नगरपरिषद
महसूल प्राप्ती
महिना महसूल
जानेवारी34,76,475
फेब्रुवारी23,02,000
मार्च16,43,950
एप्रिल18,84,725
एकूण93,07,150
Exit mobile version