| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरात वाढते पर्यटन या दृष्टीने अनेकांनी आपापल्या जागेत रिसॉर्ट, हॉटेल्स, होमस्टे उभारली आहेत. परंतु, काही व्यावसायिकांनी स्वतःच्या जागेत वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था न केल्याने आलेले पर्यटक हे आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करताना दिसतात. या कारणाने रस्त्यांवर वाहतूक कोंडी समस्या निर्माण होऊ लागली आहे.
सध्या सुट्ट्यांच्या हंगाम सुरू असून, पर्यटक एखाद दोन दिवसांच्या मुक्कामासाठी श्रीवर्धनकडे येत आहेत. अनेक रिसॉर्ट, रेस्टॉरंट चालकांनी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांच्या पार्किंग करीता जागेची व्यवस्था केली नसल्याने पर्यटक रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करताना दिसतात. अरुंद रस्ते आणि त्यात गाड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन वादविवादाच्या घटना घडल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाची गाडी अडकून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांनी या समस्येबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, नगरपरिषद आणि पोलिसांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. ज्या व्यावसायिकांनी स्वतःच्या जागेत पार्किंग व्यवस्था केली नाही त्यांना दंड करण्यात यावा, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. त्यामुळे प्रशासन या वाढत्या त्रासातून श्रीवर्धनकरांची कधी सुटका करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीवर्धन हे एक पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे पर्यटकांचा वाढता ओघ हे स्वाभाविक आहे. सद्यस्थितीत श्रीवर्धन मध्ये पार्किंगची सोय उपलब्ध नाही. लवकरच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. स्थानिक जनतेला पर्यटकांच्या गाड्यांचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी देखील उपाययोजना केल्या जातील.
ॲड. अतुल चौगुले,
नगराध्यक्ष, श्रीवर्धन







