अकरा जणांविरोधात गुन्हा
। दिघी । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे एक गंभीर घटना घडली आहे. पर्यटकांनी उशिरा रात्री घातलेल्या गोंधळाला विरोध केल्याने स्थानिकांवर पर्यटकांकडून हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात पुण्यातील 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि.7) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दिवेआगर येथील हॉटेल व्यावसायिक ओमकार महादेव धनावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीप्रमाणे, काही पर्यटक रात्री उशिरा रूमच्या बाहेर मोठ्या आवाजात आरडा ओरडा करत होते. त्यांना “गोंधळ करू नका, आवाज कमी करा” असे सांगितल्यावरून वाद निर्माण झाला. वाद चिघळत गेल्याने संबंधितांनी जमाव करून तक्रारदार ओमकार धनावडे व सिद्धेश भगत यांच्यावर हल्ला केला. या हाणामारीत दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली असून, किरकोळ ते गंभीर दुखापती झाल्याचे समोर आले आहे. यावेळी आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करत परिसरातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष आवटी व उपनिरीक्षक अर्शद शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातील अजित आंबेकर, दीक्षांत वाघमारे, केयूर कालापूरे, साई भोकारे, प्रेम डांगे, आदेश तारू, हिमांशू तावरे, साहिल पाटील, ओम ढोके, यश ढोके आणि युवराज निकम या अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दिवेआगरसारख्या पर्यटनस्थळी अशा प्रकारच्या घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पर्यटकांकडून मद्यप्राशन करून गोंधळ घालणे, अपघात व आता मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर तातडीने नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.





