| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. 20 एप्रिलपर्यंत ही मोहीम असणार आहे. अकरावी, बारावीच्या विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या मोहिमेचा आधार मिळणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याची सुरुवात रायगड जिल्ह्यात सुरु करण्यात आली असून जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी समितीकडे त्वरित अर्ज करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य जयंत चाचरकर यांनी केले आहे.
अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेत, अभियांत्रिकी पदविका व पुढील उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याची ओरड कायमच असते. प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेकवेळा विद्यार्थ्यांना या प्रवेशापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बिकट संकट निर्माण होते. विद्यार्थ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पुढाकार घेतला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम अंतर्गत विशेष मोहिमेचे आयोजन सुरु करण्यात आले आहे. 14 एप्रिलपासून ही मोहीम सुरु केली असून 20 मार्चपर्यंत ही मोहीम असणार आहे. जात वैधता प्रमाणपत्रापासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळविले आहे, त्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज सादर करण्यात यावेत, ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे, मात्र त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात हजर राहून त्रुटींची पुर्तता करावी, असे आवाहन चाचकर यांनी केले आहे. या मोहिमेतून जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्याचा आधार मिळणार आहे.





