ग्रामस्थांसह पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
| नेरळ | प्रतिनिधी |
वर्षासहलीसाठी कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणाचे आकर्षण हे अलीकडच्या काही वर्षांपासून मुंबई शहर, उपनगर आणि सर्व ठिकाणच्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. त्यामुळे सुरुवातीला स्थानिक नागरिकांकडून हा रोजगारनिर्मितीचा उत्तम मार्ग बनला असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. तसे चित्रसुद्धा निर्माण झालेले पाहायला मिळाले. परंतु, काही हौशी पर्यटकामुळे दुर्दैवी घटना तसेच येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने सोलनपाडा परिसरात बंदी घालण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील सोलनपाडा या ठिकाणी वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची दिवसेंदिवस वाढणारी बेशिस्त वागणूक, वारंवार होणाऱ्या तंटा, हाणामारी आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या सर्व बाबींचा विचार करत 16 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश या ठिकाणावर लागू करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांसह कशेळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या धरणाच्या परिसरात पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, लहान मुलांसाठी वापरलेले डायपर, दारुच्या बाटल्या झाडीझुडपात, माळरानावर आणि लागवड असलेल्या शेतीतसुद्धा अस्ताव्यस्त टाकलेल्या आहेत. तर याच धरणाच्या पाण्यावर सात गावांची पाणी योजना अवलंबून असल्याने दूषित पाण्याचा पुरवठा येथील नागरिकांना होत असल्याने भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात या चिंतेने येथील स्थानिक वर्ग प्रचंड संताप व्यक्त करत आहे.
काही हौशी आणि अतिउत्साही पर्यटकांमुळे येथील नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणाची हानीच करण्याचे काम झाले आहे. धरणाचे पाणी दूषित करणे, परिसरात कचरा, बॉटल फोडून टाकणे असे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे शेतीचेदेखील नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यायाने स्थानिकांना प्रशासनाच्या मदतीने हे ठिकाण पर्यटनासाठी बंद करावे लागत आहे.
श्रीराम थरकुटे,
स्थानिक नागरिक, सोलनपाडा







