पर्यटक वाहतूक कोंडीच्या कचाट्यात

ख्रिसमस-नववर्ष स्वागतापूर्वीच रखडलेल्या महामार्ग, बायपास कामांचा बसला फटका

| माणगाव | प्रतिनिधी |

ख्रिसमस, शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्या आणि त्यातच थर्टी फर्स्टचा मुहूर्त साधत पुणे, मुंबईसह मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांची अक्षरशः लोंढा उसळला आहे. मात्र, या पर्यटन गर्दीचे स्वागत करण्यास माणगावची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

पुणे बाजूकडून ताम्हिणी घाट मार्गे माणगावकडे येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर मुंबई बाजूकडून कोकण व तळ कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या रांगा सकाळपासूनच दोन ते तीन किलामीटर अंतरापर्यंत पोहोचल्या होत्या. परिणामी माणगाव शहर व परिसरात भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवताना माणगाव पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली.

माणगाव बस स्थानक, निजामपूर रोड, कचेरी रोड, मोर्बा नाका या प्रमुख ठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाहनांची संख्या इतकी मोठी होती की सर्व यंत्रणा अपुऱ्या पडताना दिसल्या. ख्रिसमसपासून थर्टी फर्स्टपर्यंत हीच स्थिती कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून पुढील काही दिवस माणगावकरांसाठी मोठी परीक्षा ठरणार आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून येणारे हजारो पर्यटक दिवेआगार, श्रीवर्धन, बोर्ली, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा यांसह कोकणातील विविध पर्यटनस्थळी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मात्र या पर्यटनाचा लाभ होण्याऐवजी माणगाव बाजारपेठ व अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा असह्य ताण पडत असून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरवर्षी सणासुदीच्या काळात हीच परिस्थिती ओढवते, तरीही शासन व महामार्गाचे ठेकेदार अद्याप ढिम्म का? वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कोणतीही ठोस कारवाई का होत नाही? केवळ उद्घाटनांचे श्रेय घेण्यात व्यस्त असलेली यंत्रणा प्रत्यक्षात नागरिकांच्या त्रासाकडे डोळेझाक करत आहे का, असा संतप्त सवाल माणगावकर विचारत आहेत.

पर्यटनाच्या नकाशावर कोकण झळकत असताना, तेथे जाणारा प्रमुख प्रवेशद्वार असलेला माणगावच जर ठप्प झाला असेल, तर हे शासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. वेळेत महामार्ग व बायपासची कामे पूर्ण झाली असती, तर ना नागरिकांना असा त्रास झाला असता, ना पोलिसांवर अतिरिक्त ताण आला असता. आता तरी शासनाने आणि संबंधित ठेकेदारांनी केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामाला गती द्यावी, अन्यथा सणासुदीच्या प्रत्येक सुट्टीत माणगावची वाहतूक कोंडी ही कायमची डोकेदुखी बनणार आहे.

माणगावचा रस्ता बनला कोंडमार्ग
कोकणाकडे जाणारा माणगाव हा केवळ तालुक्याचा केंद्रबिंदू नाही, तर लाखो पर्यटकांसाठीचा प्रवेशद्वार आहे. मात्र आज हे प्रवेशद्वार विकासाचे नव्हे, तर अपयशाचे, निष्क्रियतेचे आणि बेजबाबदारपणाचे जिवंत उदाहरण बनले आहे. ख्रिसमस, शनिवार, रविवार आणि थर्टी फर्स्टच्या सुट्ट्यांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी ही अचानक आलेली आपत्ती नाही. ही कोंडी म्हणजे वर्षानुवर्षे रखडवलेल्या महामार्ग आणि बायपास कामांची थेट परिणती आहे. हे शासनाला माहीत होते, ठेकेदारांना माहीत होते आणि यंत्रणेलाही माहीत होते. तरीही वेळेत कामे पूर्ण झाली नाहीत, हेच सर्वात गंभीर सत्य आहे. पुणे,ताम्हिणी, माणगाव मार्गावर आणि मुंबईकडून येणाऱ्या महामार्गावर लागलेल्या दोन ते तीन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा पाहता एकच प्रश्न उभा राहतो. हा महामार्ग नेमका कुणासाठी आहे ? नागरिकांसाठी की ठेकेदारांच्या बिलांसाठी? माणगाव पोलीस व वाहतूक शाखेचे अधिकारी जीव तोडून कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे शासन व ठेकेदार मात्र निवांतपणे फाईलांवर सही करण्यापुरते मर्यादित दिसतात. पोलिसांची दमछाक होते, नागरिकांचे तासन्‌‍‍तास हाल होतात, पर्यटक वैतागतात पण जबाबदारी कुणाचीच नाही, हीच या व्यवस्थेची शोकांतिका आहे. महामार्गावरील अपूर्ण कामे, ठिकठिकाणी उखडलेले रस्ते, फुलाची ठेवलेली अर्धवट बांधकामे आणि केवळ नावापुरता दिलेला बायपास हे सर्व मिळून माणगाव आज वाहतूक कोंडीचे केंद्र बनले आहे.
Exit mobile version