खोरा बंदरावर शेकडो वाहने दाखल
पार्किंगअभावी वाहनांची प्रचंड कोंडी
मुरूड जंजिरा | वार्ताहर |
शनिवार-रविवार सलग सुट्टी आल्याने राज्यातील विविध भागांतील पर्यटकांनी रायगडच्या समुद्रकिनारी बेफाम हजेरी लावली आहे. ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी प्रचंड संख्येने पर्यटक दाखल झाले असून, खोरा बंदर जेटीवर रविवारी सकाळपासून सुमारे 400 वाहने दाखल झाली असून, पार्किंग नसल्याने डबल लाईनमुळे वाहनांची कोंडी झाली. त्यामुळे वाहने वळविणे अवघड बाब झालेले दिसून येत होते. प्रकरण हमरीतुमरीवर येण्याचे प्रसंग घडताना दिसून येत असूनही समस्या निवारणासाठी मेरिटाईम बोर्डाचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही.
खोरा हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत 1960 पासून नॉमिनेटेड प्रवाशी बंदर असून मधल्या काळात दुरवस्था उडाल्याने बंद अवस्थेत होते. 3 ते 4 वर्षांपूर्वी राज्य मेरिटाईम बोर्डाने या बंदराचे मोठे नूतनीकरण करून नवा लुक दिला, 150 वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग तळ जोडून उभारला आहे, मात्र 3 वर्षांपासुन हा तळ अद्याप सुरू न केल्याने जंजिर्यात जाणार्या पर्यटकांच्या वाहनांची पार्किंगअभावी प्रचंड कोंडी होत असते. अनेकवेळा वाहनांची डबल रांग लागते. वाहने वळविणे जिकिरीचे होते. कमी जागेमुळे वाहनांचा धक्का लागण्याचे प्रसंग घडत असतात.
महाराष्ट्राला ऐतिहासिक स्थळे आणि 720 कि.मी.चा निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेला आहे. देशी-विदेशी पर्यटक गोव्यापेक्षा राज्यातील पर्यटनस्थळाकडे मोठ्या संख्येने वळू लागले आहेत. याचा मोठा आर्थिक लाभ स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि राज्य शासनाला मिळणार आहे. मात्र, सुविधा देताना कमी पडता काम नये, हे सूत्र कायम राखण्याची आवश्यकता आहे. राज्यतील 94 पर्यटनस्थळे आगामी काळात विकसित करण्याचे महाराष्ट्र शासनाने धोरण निश्चित केले आहे. शासनाने पर्यटन क्षेत्राला यापुढे प्राधान्य दिले तर राज्याचा समतोल विकास दूर नाही, हे मात्र निश्चित!







