पर्यटकांनी समुद्रकिनारे फुलले

मुंबई, पुणे येथील पर्यटकांची रायगडला पसंती

| अलिबाग | प्रतिनिधी |

दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दाखल झाले आहेत. त्यामुळे येथील हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल झाले आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. किनारे पर्यटकांनी फुलले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

दिवाळीनिमित्त 27 नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी काही पर्यटक आपल्या कुटुंबियांसमवेत, तर काही मित्रमंडळींसमवेत रायगड जिल्ह्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, गडकिल्ले आदी पर्यटनस्थळे गर्दीने फुलली आहेत. सुट्टी घालविण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पर्यटनासाठी पसंती दर्शविली आहे. अलिबागसह नागाव, आक्षी, वरसोली, किहीम, मांडवा, आवास, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिघी अशा अनेक समुद्रकिनारे गर्दीने ओसंडून वाहात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेकजण समुद्राच्या लाटांच्या सान्निध्यात राहून पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. काहींनी घोडागाडी, एटीव्ही बाईक्सवर स्वार होऊन समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटला. काहींनी सागरी क्रीडांचा आनंद घेत सुट्टी उत्साहात घालविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संपूर्ण किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. समुद्रकिनारी असलेलल्या स्टॉल्समधून वडापाव, भजी, पॅटीस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारत आहेत.

मासळीचा घेतला खवय्यांनी आनंद
अलिबागसह जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, कॉटेजेस पर्यटकांनी फुल्ल झाले होते. बुधवारपर्यंत या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात फिरण्यास आल्यावर ताजी मासळी खाण्यावर पर्यटकांकडून अधिक दिला जात आहे. पापलेट, सुरमई, बांगडा आदी विविध प्रकारच्या ताज्या मासळीवर पर्यटक ताव मारत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

धावपळीच्या जीवनात पर्यटन ही एक आमच्यासाठी पर्वणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कुटुंंबिय दिवाळीच्या सुट्टीत अलिबागमध्ये फिरण्यास येतो. यंदादेखील आम्ही अलिबागमध्ये सुट्टीत फिरायला आलो आहेत. समुद्रकिनाऱ्यांच्या सान्निध्यात सुट्टीचा आनंद घेताना सर्व ताण कमी होण्यास मदत होत असून, एक वेगळा उत्साहदेखील यातून मिळतो.

अमर पवार, पर्यटक

दिवाळीच्या सुट्टीत हॉटेल बुकिंग मोठ्या प्रमाणात झाली आहे. पर्यटक अलिबागसह अनेक ठिकाणी दाखल झाले आहेत. हॉटेलमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसाठी सुगीचे दिवस आहेत.

मंगेश म्हात्रे, हॉटेल व्यावसायिक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यटक रायगड जिल्ह्यात येऊ लागले आहेत. रविवारपर्यंत कॉटेजची बुकिंग फुल्ल झाली आहे. पर्यटकांच्या या वाढत्या प्रतिसादामुळे हा व्यवसाय चांगला चालत आहे.

अभिजीत वाळंज, कॉटेज व्यावसायिक
Exit mobile version