स्थानिक शेतकऱ्याला बेदम मारहाण; चैन लंपास
। दांडगुरी । प्रतिनिधी ।
पर्यटनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील तरुणांनी दिवेआगर-श्रीवर्धन परिसरात दादागिरी करत स्थानिक शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना गोंडघर येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (दि. 13) सकाळी घडली. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट जमावाकडून हल्ल्यात झाले असून, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडवली येथील शेतकरी प्रणय दिलीप किर (42) हे म्हसळा दिशेने जात असताना सोमवारी सकाळी सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपाजवळील चहाच्या टपरीसमोर एक कार रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यांनी संबंधितांना गाडी पुढे घेण्याची विनंती केली असता, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तरुणांनी “गाडी पुढे घेणार नाही, काय करायचं ते करा” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. क्षणातच वाद विकोपाला गेला आणि ओंकार आनंदा शिवळे, वेदांत संतोष शिवळे, अभिषेक रविंद्र शिवळे यांनी किर यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. दरम्यान, त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या अब्दुल रेहमान घराडे रा. कुडकी व नासी इब्राहिम खान रा. वडवली यांनाही आरोपींनी सोडले नाही. संकेत दत्तात्रेय आंद्रे व तेजस लालाजी पठारे यांनी प्लास्टिक स्टूलने पाठीवर वार करत मारहाण केली. यानंतर स्वयम नानेकर, अभिषेक यळवंडे, गौरव यळवंडे व गौरव यळवंडे हे ही घटनास्थळी येत जमाव वाढला आणि हल्ल्याची तीव्रता अधिक वाढली. या अमानुष मारहाणीत प्रणय किर यांच्या चेहऱ्यावर, डाव्या डोळ्याजवळ, पाठीवर व पायावर गंभीर दुखापती झाल्या. गोंधळाच्या दरम्यान त्यांची सोन्याची चैन तुटून गहाळ झाल्याची ही नोंद आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “पर्यटक म्हणून येऊन स्थानिकांवरच हल्ले करायचे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. शांत व पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या दिवेआगर-श्रीवर्धन परिसरात अशा प्रकारांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाई सुरू आहे.







