। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन समुद्रकिनार्याचे सुशोभीकरण झाल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे, मात्र येथे येणार्या पर्यटकांकडून नगर परिषदेचा पर्यावरण नियंत्रण कर आणि स्वच्छता उपविधी कर न देताच गवात प्रवेश केला जात आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या वेळी कर्तव्यावर असणार्या कर्मचार्यांशी हुज्जतदेखील घातली जात आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
2015 पासून श्रीवर्धनचे प्रवेशद्वार असलेले श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे येथे गावात प्रवेश करणार्या पर्यटकांकडून पर्यावरण नियंत्रण कर आणि स्वच्छता उपविधी कर आकारला जातोय. चारचाकी वाहनांना 30 रुपये, सहाचाकी वाहनांना 70 रुपये, तर अवजड वाहनांना 90 रुपये इतका कर आकारला जातो. कराच्या माध्यमातून नगर परिषदेला ही आर्थिक उत्पन्न प्राप्त होत आहे.
श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार कमान येथे नगर परिषदेचे कर्मचारी कर पावती देण्यासाठी व कर रक्कम घेण्यासाठी तैनात असतात. पर्यटकांनी प्रवेशद्वाराजवळ वाहनांचा वेग कमी करावा यासाठी तेथे गतिरोधक बसविण्यात आले आहेत, तसेच रस्त्याच्या मधोमध उभ्या अवस्थेत लोखंडी बॅरिकेट्स ठेवण्यात आले आहेत, मात्र श्रीवर्धन येथे येणार्या अनेक पर्यटकांकडून नगर परिषद कर्मचार्यांनी वाहन थांबवण्यासाठी इशारा केल्यानंतरही वाहन न थांबवता कर पावती भरण्यास टाळाटाळ केली जात आहे, तर काही उद्दाम पर्यटक कर्मचारी थांबण्याचा इशारा देऊनसुद्धा गाडी थांबण्याची दखल घेत नाही. कर्मचार्याला हुल देणे, वाहन चुकीच्या बाजूने आणून गावात प्रवेश करणे, अनेक वेळप्रसंगी लोखंडी बॅरिकेट्सला धडक देत गावात अवैध प्रवेश करणे, असे कृत्य पर्यटकांकडून केले जात आहे. मौजमजा करण्यासाठी येणारे पर्यटक अत्यल्प कर देण्यास टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
लोकप्रतिनिधींच्या नावांचा गैरवापर
श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार येथे कर चुकवून गावात येणार्या पर्यटकांच्या वाहनास नगर परिषद कर्मचार्यांनी पाठलाग करून अडविल्यास येथील लोकप्रतिनिधींचे किंवा एखाद्या पक्षाच्या पदाधिकार्याचे नातेवाईक आहोत, असे सांगत कर देण्यास टाळाटाळ केली जाते, तसेच अनेकदा पर्यटकांकडून कर्मचार्यांजवळ दादागिरीची भाषा वापरली जाते. हरिहरेश्वर येथे पर्यटकांनी गाडी खाली महिलेला चिरडून जीवे मारल्याची घटना नुकतीच घडली असल्याने याप्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, असे बोललेजात आहे.