मुरूडमध्ये पर्यटकांची अलोट गर्दी

। मुरुड । वार्ताहर ।

मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला हा सोमवार (दि. 26) मे पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटचा शनिवार, रविवारची सुट्टी साधून आज असंख्य पर्यटकांनी किल्ला पहाण्यासाठी अलोट गर्दी केली होती.

किल्ला पहाण्यासाठी औरंगाबाद, जालना, परभणी, कल्याण, डोंबिवली, बोरिवली आदी भागातून हजारो पर्यटक मोठ्या संख्येने आले होते. त्यातच पावसाळा जवळ आल्याने लाटांचा प्रवाह वाढल्याने शिडाच्या बोटी हेलकावे घेत असल्याने किल्ल्यावर उतरणे जिकरीचे झाले होते.परंतु थोड्या संयमाने पर्यटक किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ उतरत होते. किल्ल्यावर गर्दी झाल्याने असंख्य पर्यटकांनी शिडाच्या बोटींमधून किल्ल्यास प्रदक्षिणा घालून किल्ल्याचे रूप बाहेरून पाहण्यात समाधान करून घेतले. शिडाच्या बोटीवर काम करणार्‍यांना तीन महिने घरीच बसावे लागणार आहे. म्हणून जास्ती जास्त पर्यटकांना किल्ल्यात नेण्याचा प्रयत्न शिडाच्या बोटीधारकांनी केला.

Exit mobile version