। आगरदांडा/मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
शुक्रवार, शनिवारपासून रायगडातील तापमानात मोठी वाढ झाली असल्याचे जाणवत आहे. पर्यटन क्षेत्र तालुका असणाऱ्या मुरूड जंजिरा तालुक्यातदेखील उष्णतेचा पारा वाढला असून, 41 सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. हवामान खात्याने उष्णतेची लाट येणार असल्याचे स्पष्ट केले होते. 30 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उष्णतेच्या मोठ्या लाटेचा परिणाम पर्यटनावर झाला असून, काशीद, मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनावर झाल्याचे दिसून आहे. एरव्ही मोठ्या संख्येने असलेल्या पर्यटकांनी शनिवार-रविवार सुट्टी असूनही पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसल्याचे काशीद येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत जंगम यांनी सांगितले.
पर्यटनाच्या ऐन हंगामामध्ये वाढत्या तापमानामुळे, उन्हाच्या काहिलीने नागरिक, पर्यटक हैराण झाले असून, रविवारी सकाळपासून फारसे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर दिसून आले नाहीत. मुरूडसारख्या किनारी भागात 37 ते 40 सेल्सियसपर्यंत तापमान पारा जाणे यावरून दाहकता लक्षात येत असल्याची चर्चा मुरूड परिसरात ऐकायला मिळत आहे. तापमान वाढीमुळे रस्त्यावरून बाईक, सायकल किंवा चालत जातानादेखील त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वातानुकूलित निवास सुविधा असणाऱ्या रेस्ट हाऊसला पर्यटक प्राधान्य देत असल्याचे मनोहर बैले यांनी सांगितले. सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत नागरिकांनी किंवा पर्यटकांनी विनाकारण बाहेर जाणे टाळावे असे आवाहन शासनाच्या आरोग्य विभागाने केले आहे. समुद्रकिनारी वातावरणदेखील तप्त झाले असून, रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. वाढत्या उन्हाच्या काहीलीमुळे ज्येष्ठ मंडळींनादेखील त्रास होत आहे. दुपारी महत्त्वाच्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.
पर्यटकांची मुरुडकडे पाठ; स्थानिक व्यावसायिकांना फटका

Exif_JPEG_420