ई-रिक्षाच्या मर्यादित संख्येमुळे नाराजी
| माथेरान | वार्ताहर |
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी माथेरानमध्ये देश-विदेशातून अनेक पर्यटक दाखल झाले होते. सरत्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी माथेरान सज्ज असताना पर्यटकांचा उत्साही ओसंडून वाहताना दिसला होता; परंतु आज माथेरानमधून जाताना मात्र पर्यटकांना ई-रिक्षाकरिता लांबच्या लांब रांगांना सामोरे जावे लागले. अपुर्या रिक्षांमुळे पर्यटकांचा खोळंबा झालेला दिसून आला.
मागील काही दिवसांपासून माथेरानमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला असून, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे अनेक पर्यटक दाखल झाले होते, तर नाताळच्या सुट्ट्यांमध्येही पर्यटक माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात आले होते. त्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. माथेरानकरिता मिनी ट्रेनच्या अपुर्या फेर्या, नियोजनाचा अभाव, तर ई-रिक्षांची मर्यादित संख्या यामुळे येथे येणार्या ज्येष्ठ नागरिक दिव्यांग पर्यटक महिला, मुले यांना त्याचा मोठा फटका दिसून आला. मिनी ट्रेनच्या सफरीकरिता लांबच्या लांब रांगा पहावयास मिळत होत्या. तर ई-रिक्षाकरिता दोन तास रांगेमध्ये उभे राहिल्यानंतर पर्यटकांना रिक्षा उपलब्ध होत होत्या. त्यामुळे पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली. रिक्षामध्ये वाढ करण्याची सातत्याने मागणी होत असतानाही त्याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा विपरीत परिणाम माथेरानच्या पर्यटनावर तर होणार नाही ना, असा प्रश्न स्थानिक विचारीत आहेत.
माथेरान 94 हातरिक्षा असताना फक्त 20 ई-रिक्षांना परवानगी दिली गेली आहे. या ई-रिक्षांमधून माफक म्हणजे फक्त 35 रुपये दर प्रतिव्यक्ती असल्याने पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून येथे पर्यटकांचा ओघ वाढलेला दिसून येतो. परंतु या रिक्षांमध्ये वाढ व्हावी तसेच बॅगासुद्धा घेण्यात याव्यात, ही आम्हा सर्व पर्यटकांची मागणी आहे.
– अनुप मढवी, पर्यटक मुंबई