| पनवेल | वार्ताहर |
खारघर वसाहतीमधील सेक्टर 27 येथील बी.डी. सोमानी शाळेसमोरील रस्त्यावर पोलिसांनी एका व्यक्तीला सव्वातीन लाखांच्या कोकेन या अमली पदार्थासह अटक केली. बासील रोनाल्डो ओबीओरो असे अटक आरोपीचे नाव आहे.
खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीसाठी येणार्या व्यक्तीला पकडण्यासाठी सेक्टर 27 येथील मेट्रो पुलासमोरील रस्त्यावर पोलीस निरीक्षक शीतल पाटील, पोलीस उपनिरीक्षक वर्षा काळे, पोलीस शिपाई श्रीकांत म्हात्रे यांच्यासह सापळा लावून एका संशयित दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन पिशव्यांमध्ये 32.28 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले.