| ठाणे । प्रतिनिधी ।
प्रीपेड स्मार्ट मीटर सर्वसामान्यांची लूट करणारे आहे. त्यामुळे हे मीटर बसविण्यात येऊ नये, अशी मागणी ठाणे येथील शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी यांनी केली आहे. शासनाने त्या पद्धतीने निर्णय काढून जनतेचे हित साधावे. असे सांगत सादर केलेल्या निवेदनात प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेविरोधात ठाण्यातील नागरिकांची आणि राज्यभरातील लोकांची भूमिका स्पष्ट केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी सादर केली. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात लोकांच्या भावना आहेत. मागील सरकारच्या काळात अनेक राज्यांमध्ये याच्या विरोधात तीव्र जनमत तयार झाले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागला होता. ठाण्यात तसेच महाराष्ट्रभरात तसेच संपूर्ण भारतात याचा विरोध कायम आहे.
वीज वितरण प्रणालीचे खासगीकरण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री यांना शेतकरी कामगार पक्षाने पत्र पाठवले आहे. या पत्रात, ‘स्मार्ट मीटर’ योजना एक धोका ठरू शकते, हे लक्षात घेत या योजनेला विरोध करण्यात येत आहे. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी, ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे, युवक आघाडीचे निखिल सशीधरण, विभाग अध्यक्ष चंदन भारद्वाज, शांतीनगर शाखा अध्यक्ष किशोर ननावरे, साईनाथ मोरे, मुकेश भोईर, सिद्धार्थ तायडे, आदित्य वाघमारे आदी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संबंधित अधिकार्यांना तातडीने आदेश देऊन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविणे थांबवावे. ठाणे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही सरकारला हा मुद्दा सुस्पष्टपणे मांडला असून, जनतेच्या भल्यासाठी सरकार या बाबींचा गांभीर्याने विचार करेल, अशी आम्हाला आशा आहे. अन्यथा शेतकरी कामगार पक्ष जनतेसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली.