रशिया आणि युक्रेनदरम्यानची युद्धसदृश्य परिस्थिती ताज्या घडामोडींमुळे अधिक गंभीर होताना दिसत असून त्याची वाटचाल अखेर अपरिहार्यपणे युद्धाकडे सुरू झाल्याची भीती वाटत आहे. त्याला रशियाने घेतलेली आक्रमक भूमिका कारणीभूत असून युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा निर्णय त्याच्या मुळाशी आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा तेथील स्थानिक नेत्यांचा निर्णय मान्य केला आणि तेथील जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे तणाव आणखी वाढण्याची भीती जगभरात निर्माण झाली आहे. रशियाने सदर दोन फुटीरतावादी प्रांतांना मान्यता दिल्यामुळे रशियाकडून युक्रेनवर हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. बंडखोरांच्या ताब्यातील लुहान्स आणि डोनेस्क हे दोन प्रदेश आपल्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी आणि युक्रेनच्या कथित लष्करी आक्रमणाविरुद्ध संरक्षणासाठी लष्करी मदतीची तरतूद करावी, असे आवाहन फुटीरतावादी नेते पुतीन यांना करत होते. पुतिन यांनी या पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थक फुटीर प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले व त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या करारावर त्यांनी स्वाक्षरीही केली. त्यानंतर अमेरिकेने या भागांवर आर्थिक निर्बंध जाहीर केले. रशियाच्या या निर्णयावर युरोपीय संघ, नाटो यांच्यासह अन्य देशांनीही टीका केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी फ्रान्स आणि जर्मनीच्या प्रमुखांशी चर्चा करत असून रशियाने आपल्या या निर्णयाचे स्पष्टीकरण द्यायला हवे, असा या देशांचा आग्रह आहे. दरम्यान, रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यासही सुरुवात केली आहे. या घडामोडींचा जगाच्या अर्थकारणाशी जोडले गेलेले आणि न जोडले गेलेले सगळे देश या युद्धसदृश्य तणावामुळे आर्थिक तणावाखाली आले आहेत. या घडामोडींमुळे जगभरातील शेअर बाजारांत घसरण झाली. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली असून निफ्टी 16920 अंकांच्या पातळीवर आला आहे. थोडक्यात, कंपन्यांच्या बाजार भांडवलीमूल्याचे पाच लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. अशा संघर्षात सर्वाधिक भिती असते ती कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची. त्यानुसार, या किंमती गेल्या आठ वर्षांचा उच्चांक गाठत असून हे संकट अधिक गंभीर बनल्यास आता आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल 96 डॉलरवर गेलेल्या किंमती अजून मोठ्या प्रमाणात वाढतील. तसे झाल्यास भारतात महागाईचा नवा राक्षस मोकाट सुटू शकतो. अर्थात भारतानेही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या तातडीने बोलावलेल्या बैठकीत आपले मत मांडले असून दोन्ही देशांमधील तणाव वाढणे ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त केले आहे. दोन्ही देशांनी संघर्ष टाळण्याला प्राधान्य दिले पाहिजे, म्हटले आहे. युक्रेनमध्ये 20 हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक राहात आहेत. गेले काही दिवस भारतीयांना या परिस्थितीत सुरक्षित ठेवणे अथवा शक्यतो त्यांना तेथून बाहेर काढणे यावर भारतीय अधिकार्यांचा भर असून त्यादृष्टीने एअर इंडियाची विमाने युक्रेनला रवाना करण्यात येत आहेत. डॉनेत्स्क आणि लुहान्स्कमधील नागरिकांच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासंबंधीचा हा निर्णय फार पूर्वी घ्यायला हवा होता, असे सांगत पुतीन यांनी आधी केलेल्या निवेदनानुसारच युक्रेन हा रशियन इतिहासाचा अविभाज्य भाग आहे आणि पूर्व युक्रेन ही प्राचीन रशियन भूमी आहे, याचा जनतेला संबोधित करताना केलेल्या भाषणात पुनरुच्चार केला. पुतीन यांच्या या सर्वांना चकित करणार्या निर्णयावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी आपल्याला कोणतीही भीती नसून पाश्चिमात्य देश आपल्याला पूर्ण पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावरून युक्रेनला नाटो तसेच युरोपीयन संघात सामील होण्यापासून रोखणे हा रशियाचा हेतू असून अमेरिकेला रशियाचा हा हेतू याच कारणास्तव हाणून पाडायचा आहे हे स्पष्ट होत. एक आजी महासत्ता आणि एक माजी महासत्ता यांच्यातील येत्या काही दशकांसाठीची ही साठमारी चालली आहे आणि त्यात युक्रेनचे तुकडे होत आहेत, असे सकृतदर्शनी दिसते. म्हणजे सत्तरच्या दशकातील व्हिएतनामची जागा आता युक्रेनने घेतली आहे, असे म्हणता येईल. या नव्या संघर्षात व्यापारी क्षेत्राचा विस्तार महत्वाचा असल्याने रशियाला सागरी प्रदेशात व्यापारी अटकाव करणार्या नाटोला नडण्यासाठी पुतीन युक्रेनचे टप्प्याटप्प्याने तुकडे करत असून अमेरिका पुतीनवर आपल्या याच व्यापारी साम्राज्याला विस्तारण्यासाठी दबाव आणत आहे.
युद्धाकडे वाटचाल

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025