रेवदंडा आगरकोट किल्ल्याची दुरवस्था
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा समुद्र किनाऱ्यालगत उभारलेला पोर्तुगीजकालीन आगरकोट किल्ला पाचशे वर्षापासून अस्तित्व टिकवून आहे. काळानुरूप किल्ल्याची पडझड होऊ लागली असली तरी इतिहासाच्या खुणा या ठिकाणी पहावयास मिळतात. आज या किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. मात्र योग्य देखभाल झाल्यास ऐतिहासिक ठेवा वाचेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.
पोर्तुगीज कप्तान सौज यांने सन 1528 मध्ये किनारा बांधायला सुरूवात केली. त्यापूर्वी 1516 मध्ये पोर्तुगीज कारखान्यासाठी इमारत बांधली. तिला चौकोनी बुरूज म्हणतात. या किल्ल्याची तटबंदी 1521 ते 1524 च्या दरम्यान बांधली गेली. रेवदंडा गडाच्या तटबंदीचा परीघ 5 किमीचा असून एकूण 22 तटबंदी होत्या. रेवदंड्यात प्रवेश करणार्या रस्त्यावर किल्याच्या प्रवेशद्वारावर पोर्तुगीज राजचिन्ह कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पुढे तीन मोठे दगडी गोळे पडले आहेत. दरवाजाच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. त्या जिन्याने वर गेल्यावर भिंतीमध्ये अडकलेला एक तोफगोळा दिसतो. त्यानंतरचे दुर्गावषेश किनार्यावर आहेत. त्यातील विशेष म्हणजे तटबंदी असलेले भुयारी मार्ग होय. या भुयारात शिरायला 6 वाटा आहेत. परंतू सर्व वाटा आता बंद आहेत.

22 जुलै 1683 च्या रात्री मराठ्यांनी या किल्ल्यावर हल्ला केला. परंतु पोर्तुगीजांनी तो उधळून लावला. मराठ्यांनी घातलेला हा वेढा मोडून काढण्यासाठी पोर्तुगिजांनी फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठयांना मोहिम सोडून जावे लागले. 25 नोव्हेबर 1740 रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगिजांनी साष्ठीतील गावाच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लई ताबा मराठ्यांना दिला. मात्र 1806 मध्ये इंग्रजानी ताबा घेतला. 1817 मध्ये आंग्र्रेनी हा गड जिंकला पण लगेच 1818 मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजाकडे गेला.
आता उरलेत अवशेष
रेवदंडा किल्लाच्या आत 29 मीटर उंच सातखणी मनोरे बांधले होते. या मनोर्याला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार म्हणत. या सातखणी मनोर्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेला जंजिर्यापर्यत टेहळणी करता येत असे. पुर्वी सात मजल्यावरून मुंबई दिसायची. मनोर्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या आहेत. याशिवाय चर्चचे अवशेष, घराचे, वाड्याचे अवशेष आहेत. किल्लाच्या खालून शेंडेच्या वाडीतून एक भुयारी मार्ग असून, तो समुद्राच्या खालून कोर्लई किल्लापर्यंत जात असल्याचे बोलले जाते.
पर्यटनासाठी उपयुक्त ठिकाण
आता केवळ नावापुरताच हा किल्ला उरला आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या आगरकोटची योग्यप्रकारे देखभाल केली गेली तर निश्चितच इतिहासाचा ठेवा वाचला जाईल आणि पर्यटनासाठी तो उपयुक्त ठरेल. यासाठी राज्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.