बगळी तयार करण्याची लगबग सुरू

| अलिबाग | प्रमोद जाधव |

बाजारात मासेमारीसाठी आधुनिकतेच्या युगात वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या उपलब्ध आहेत. मात्र आजही पावसाळ्यात गोड्या पाण्यातील चिंबोरी पकडण्यासाठी परंपरागत असलेली बगळीचा वापर केला जात आहे. त्यामुळे पारंपारीक साधन सामुग्रीचा वापर करण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पावसाचा हंगाम कमी झाल्यावर बगळी तयार करण्याचे काम सुरु केले जाते. सध्या जिल्ह्यात पावसाचा हंगाम कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात गावे, वाड्यांमध्ये बगळी तयार करण्याचे काम केले जात आहे. बांबूच्या काठयांची बगळी तयार केली जात आहे. तयार केलेली बगळी संध्याकाळच्या वेळेला नदी किनारी नेऊन एका कोपऱ्यात पाण्यामध्ये ती ठेवली जात आहे. त्या बगळीमध्ये मृत झालेले माशांचे तुकडे टाकणे. त्या वासावर चिंबोरी येऊन खाण्याचा प्रयत्न करीत असते. त्यानंतर चिंबोरी बगळीमध्ये अडकली जाते. बगळीच्या जाळ्यात चिंबोरी अडकल्यावर पुन्हा ती बाहेर पडू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. संध्याकाळी नदी किनारी ठेवलेली बगळी दुसऱ्या दिवशी सकाळी काढली जाते. त्या बगळीत येणाऱ्या चिंबोऱ्या काही जण विकतात. तर काही जण स्वतःसाठी खाण्यासाठी ठेवतात. या चिंबोऱ्यातून काहींना रोजगाराचे साधन मिळत असल्याचे चित्र ही पहावयास मिळत आहे. बगळी तयार करण्यापासून नदी किनारी लावण्यापर्यंतची कामे करण्यासाठी ज्येष्ट मंडळीसह तरुणाईदेखील सहभागी होत आहे.

पाऊस कमी झाल्यावर चिंबोरी पकडण्यासाठी बगळी नदीमध्ये कोपऱ्यात लावली जाते. पावसाळ्यात गोड्या पाण्यातील चिंबोरीचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. त्यामुळे एक वेगळा आनंद मिळतो.

निलेश भोपी, महाजने

बांबूच्या काठ्यांची बगळी टीकाऊ असते. ती मजबूत असल्याने चिंबोऱ्या पकडण्यासाठी बांबूच्या काठ्यांची बगळी फायदेशीर ठरते. ही बगळी तयार करण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास लागतात.

मंगेश औचटकर, बगळी कारागीर
Exit mobile version