बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक शाखेचा दणका

रस्ते अडवून पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शहरातील मोहल्ला परिसरात बेशिस्त पार्किंग करून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या वाहनचालकांविरोधात अखेर पनवेल शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा कुठेही उभ्या करून रस्ते अडविण्याच्या प्रकारांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी स्वतः लक्ष घालत संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली.

वाहनचालकांनी मनमानी पार्किंग बंद करून वाहने निर्धारित जागेतच उभी करावीत, रिक्षाचालकांनी अधिकृत रिक्षा थांब्यांचाच वापर करावा आणि रस्त्याच्या मध्यभागी हातगाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. परिसरातील अनेक जुनी व बेवारस वाहने रस्त्यावर धूळ खात पडून असल्याने वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. ही वाहने हटविण्यासाठी पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे पुजारी यांनी स्पष्ट केले.

या कारवाईदरम्यान स्थानिक नगरसेवक लतीफ शेख, माजी नगरसेवक मुकीत काझी आणि युवा नेतृत्व जवाद काझी यांनी पुजारी यांची भेट घेऊन परिसरातील वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. मोहल्ला परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नियमभंग करणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Exit mobile version