महामार्गासह इतरही ठिकाणी पर्यटक बेजार; पोलिसांनी योग्य नियोजन करणे अपेक्षित
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
चौथा शनिवार, रविवार आणि 26 जानेवारीची सुट्टी अशा सलग तीन सुट्ट्या आल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर तळ कोकण, गोवा आणि रायगड या ठिकाणी पर्यटनासाठी निघाले. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर पाली शहरात देखील वाहतूक कोंडी झाली होती. पर्यटक व प्रवासी या कोंडीने बेजार झाले होते.
शनिवारी (दि.24) सकाळ पासूनच मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे ते माणगाव दरम्यान, नाणोरे ते ढालघर फाटा येथे, तसेच कशेणे गाव ते इंदापूर, पोटणेर, कोलाड, खांब गाव, कोलेटी याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अवघे तीन ते चार किलोमीटरचे अंतर कापायला खूप वेळ लागत होता. तसेच पाली खोपोली मार्गावर पाली फाटा ते इमॅजिक इथे देखील वाहतूक कोंडी होती. यामुळे प्रवासी व पर्यटक पुरते बेजार झाले होते. विशेष म्हणजे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरतीच वाहतूक कोंडी होती. तर गोव्याच्या दिशेकडून मुंबईकडे जाणारा मार्ग मोकळा होता.
पाली शहरात देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. कारण येथून विळे कोलाड व माणगाव मार्गे कोकणात व गोव्याला जायला रोड आहे अनेक पर्यटक या मार्गे प्रवास करत होते. परिणामी पाली शहरात व पुढील मार्गावर वाहतूक कोंडी होती. या संदर्भात स्थानिक प्रशासनाने व पोलिसांनी योग्य नियोजन करून वाहतूक कोंडी सोडवणे अपेक्षित होते. मात्र, तशा प्रकारे वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी कोणी नव्हते. असे पालीतील मयूर कारखानीस यांनी सांगितले.
महामार्गाची रखडपट्टी
मुंबई- गोवा महामार्गाचा पहिला टप्पा पळस्पे ते इंदापूर 84 किमी लांबीचा आहे. मागील 17 वर्षापासून अजून पूर्ण झालेला नाही. अनेक ठिकाणच्या उड्डाणपूलांचे काम अजून बाकी आहे. त्यामुळे त्याच्या बाजूने खराब रस्त्यातून जावे लागते. इंदापूर व माणगाव बायपास रस्त्याचे काम रखडले आहे. तसेच आणखी बऱ्याच ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीन भर पडते.
गतिरोधकांचा त्रास
इंदापूर ते पळस्पे दरम्यान अनेक ठिकाणी गतिरोधक आहेत. मात्र, या गतिरोधकांना कोणतेही मोजमाप नाही. कुठे उंच गतिरोधक आहेत तर कुठे रुंद गतिरोधक आहेत. तर काही गतिरोधकांना पांढरे पट्टे देखील मारण्यात आलेले नाहीत. यामुळे वाहने जोरदार आदळतात तर काही वेळेला अपघात होतात तसेच वाहतूक सुद्धा मंदावते व कोंडी होते.
सलग सुट्ट्या आल्यामुळे ट्रॅफिक वाढली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शिवाय शनिवारी व रविवारी अधिक पोलीस तैनात असतात. पुणे व मुंबई या बाजूने एकाचवेळी अनेक वाहने दाखल झाली. तसेच या ठिकाणी पर्यायी रस्त्याची व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी आणखी वाढते. वाहनचालकांनीही वाहतुकीची नियम पाळावेत जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल.
-निवृत्ती बोऱ्हाडे,
पोलीस निरीक्षक, माणगाव पोलीस ठाणे







