पाली फाटा-इमॅजिका मार्गावर वाहतूक कोंडी

आंबेडकरी योद्धा संघटनेचे पोलिसांना निवेदन

| वावोशी | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील पाली फाटा ते इमॅजिका दरम्यानच्या राज्य मार्गावर दर शुक्रवार ते रविवार होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा कडक इशारा आंबेडकरी योद्धा संघटनेने दिला आहे.

यासंदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेश गायकवाड व जिल्हाध्यक्ष मारुती भिमा गायकवाड यांनी खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाली फाटा-पाली वाकण राज्य मार्गावर विशेषतः शुक्रवार, शनिवार व रविवारी वाहनांच्या तीन ते चार रांगा लागतात. त्यामुळे अनेकदा दोन ते तीन तास वाहतूक ठप्प होत असून नागरिक, कामगार आणि पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या परिसरात इमॅजिका पर्यटनस्थळ तसेच अनेक औद्योगिक कंपन्या असल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. परिणामी वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊन कोंडी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर संबंधित तीन दिवस अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करून वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच वाहतूक कोंडीत एखादी ॲम्ब्युलन्स किंवा अपघातग्रस्त वाहन अडकल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. इमॅजिका प्रशासन व संबंधित कंपन्यांनाही वाहतूक नियोजनाबाबत आवश्यक सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांच्या दैनंदिन हालअपेष्टा लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत संघटनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विजय गाऊडसे, सुधागड तालुका अध्यक्ष निलेश गायकवाड, तालुका सचिव समीर साळुंखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version