| कोर्लई | प्रतिनिधी |
मागील चार दिवस सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेखार येथून सुपेगाव मार्गे मुरुडकडे जाणारा मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली.
रोहा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन याठिकाणी सेफ्टी रिबीन आणि सुचना फलक लावले असून, नागरिकांनी या मार्गाने प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मुरुड- साळाव मार्गे रोहा मार्गाचा वापर करावा व सुपेगाव रस्ता पुर्ववत होई पर्यंत वाहतूकीसाठी वापरु नये असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय बागूल, शाखा अभियंता अरुण पाटील यांनी केले आहे.
मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा रस्ता कधीही पूर्णपणे वाहून जाण्याची शक्यता असल्याचेही संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. याठिकाणी सुरक्षेसाठी सुचना फलक व सेफ्टी रिबीन लावण्यात आली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मुरुड तहसिल, नांदगाव मंडळ अधिकारी व त्यांच्या टीमने या रस्त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदारास तात्पुरत्या स्वरूपात रस्ता पूर्वस्थितीत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे समजते. आवश्यक दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय बागूल यांनी दिली.







