प्रवाशांचा संताप, सेवा सुरळीत करण्याची मागणी
| दिघी | वार्ताहर |
मागील दिवसांपासून श्रीवर्धन महामंडळाच्या भाईंदर, नालासोपारा, ठाणे या उपनगरात जाणाऱ्या एस.टी. फेऱ्या रद्द होत आहेत. आगाराकडून बोर्लीपंचतन विभागाला सुरळीत सेवा मिळावी अशी मागणी होत असताना त्यामध्ये मुंबईहून सायंकाळी पाच वाजता सुटणारी मुंबई-बोर्लीपंचतन-श्रीवर्धन एसटी बंद झाल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे.
श्रीवर्धन आगारातुन नालासोपारा, भांडुप, ठाणे, ठिकाणी बसेस जातात. गेल्या काही दिवसांपासून या शहरातील तेरा ते चौदा फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबईतील सगळी कामे आटपून सायंकाळी पाच वाजता बोर्लीपंचतनमार्गे श्रीवर्धन गाडीने येणाऱ्या दिघी परिसरातुन प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. ती बस बंद झाल्याने मुंबई सेंट्रल येथे रात्रीच्या दहानंतर सुटणाऱ्या एसटीची वाट बघत ताटकळत बसावे लागते. तालुक्यात एस. टी. ची वाट पाहिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुंबईहून सायंकाळी पाच वाजता सुटणारी एसटी श्रीवर्धन आगाराकडून सुरु करावी अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.
प्रवाशी नसल्याने मुंबई एसटी बस बंद करण्यात आली आहे, त्यामध्ये वाहक चालक संख्या सुद्धा कमी झाली आहे. जानेवारीमध्ये बंद केलेल्या बस पुन्हा सुरु केल्या जातील.
महेबुब मनेर, श्रीवर्धन आगार प्रमुख.
कित्येक वर्ष या मुंबई गाडीने आम्ही प्रवास करत आहोत. कामानिमित्त मुंबईत आल्यावर गावी जाण्यासाठी योग्य वेळेत सायंकाळी जाणारी गाडी बंद झाल्याने सहा तासांनी सुटणाऱ्या गाड्यांमुळे पोहचण्यास उशीर होत आहे.
नंदकिशोर भाटकर, बोर्लीपंचतन, प्रवासी






