अष्टविनायक तीर्थक्षेत्रात वाहतूक कोंडी

नागरिक-भाविक झाले बेजार; रुग्णवाहिका पोहोचण्यास उशिर

| राबगाव | वार्ताहर |

अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक व भाविक अक्षरशः बेजार झाले आहेत. येथील बाह्यवळण मार्गाला मान्यता मिळून 14 वर्षे होत आली आहेत. मात्र, अनेक अडचणीमुळे त्याला पूर्ण होण्यास अजून काही मुहूर्त सापडलेला नाही. बाह्यवळण मार्ग झाल्यास येथील वाहतूक कोंडीची समस्या बहुतांशी सुटेल. मागील 13 वर्षांपासून पत्रकार या संदर्भात लक्ष वेधत आहोत.

पालीत नेहमीच भाविकांची गर्दी असते. रोज हजारोच्या संख्येने भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्याबरोबरच पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त व विद्यार्थी शाळा व कॉलेजमध्ये येत असतात. त्यातच पालीतील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, अवैधरीत्या पार्क केलेली वाहने व अनधिकृत बांधकामे यामुळे पालीत वारंवार वाहतूक कोंडी होते. परिणामी वाहनचालक, भाविक, पादचारी व विद्यार्थ्यांची येथून वाट काढताना मोठी गैरसोय
होत आहे.

बल्लाळेश्वर मंदिर, ग. बा. वडेर हायस्कूल, जुने एसटी स्टँड, गांधी चौक, मारुती मंदिर, बाजारपेठ, हाटाळेश्वर चौक, मारुती मंदिर अशा बहुतांश ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. असंख्य कारणांमुळे पोलिसांनी या वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी तैनात असतात. अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास उशिर होतो. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बाह्यवळण मार्ग लवकर करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांकडून वारंवार होत आहे.

पर्यायी मार्ग लालफितीत अडकला
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाह्यवळण रस्ता काढणे हा एकमेव पर्याय आहे. बाह्यवळण मार्ग लवकर सुरु व्हावा यासाठी फारसे कोणी पाठपुरावा करतांना दिसत नाही. बलाप गावावरुन थेट मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे. परंतु, हा पर्यायी मार्ग अजूनही लालफितीत अडकला आहे.
Exit mobile version