Traffic Jam: उरण नाक्यावर वाहतूक कोंडी

उन्हाच्या तडाख्यात नागरिक हैराण

। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।

पनवेल शहरातील उरण नाका परिसरात बुधवारी (दि.17) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. उरण नाका चौकातून घाऊक बाजारपेठ, मच्छी मार्केट तसेच रायगड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वाहतुकीचा ताण वाढल्याने चारही दिशांनी रस्ते पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. बाजारपेठेकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनांसह दुचाकी, रिक्षा आणि खासगी वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाढत्या उष्णतेमुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना उन्हाचा तीव्र त्रास सहन करावा लागला.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न केले, मात्र वाहनांची संख्या अधिक असल्याने काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. यामुळे परिसरात संथ गतीने वाहतूक सुरू राहिली. दरम्यान, उरण नाका परिसरातील वाहतूक व्यवस्थेत कायमस्वरूपी सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version