तळा बाजारपेठेत अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

ट्रॅफिक पोलिसांची आवश्यकता; अल्पवयीन मुलांचे गाडी चालविण्याचे प्रमाण वाढले
| तळा | श्रीकांत नांदगावकर |
तळा बाजारपेठेत होत असलेल्या अवैध पार्किंगमुळे दिवसेंदिवस वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे बाजारपेठ परिसरात ट्रॅफिक पोलिसांची आवश्यकता असल्याचे मत व्यापारी व नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. तळा बाजारपेठ ही लहान स्वरूपाची असून बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले ग्राहक आपली दुचाकी व चारचाकी वाहने बाजारपेठ परिसरात कोठेही पार्क करून ठेवतात. यामुळे समोरासमोर दोन एसटी बसेस किंवा ट्रक, टेम्पो आल्यास बेशिस्त पार्किंगमुळे तसेच अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. ही वाहतूककोंडी सुटताना बराचसा वेळ वाया जातो.

त्यामुळे ट्रॅफिक पोलीस जर बाजारपेठ परिसरात असल्यास अवैधरित्या पार्किंगला आळा बसेल तसेच बाजारपेठेत वाहतूक कोंडीची उद्भवणारी समस्या मार्गी लागेल.यांसह तळा बाजारपेठेत दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांचे दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.लहान मुले ट्रिपल शीट घेऊन बाजारपेठ परिसरातून वेगाने गाडी पळवितात.यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. पालक कोणताही विचार न करता आपल्या अल्पवयीन मुलांना स्कुटी, मोटारसायकल चालविण्यासाठी देतात तसेच लायसन्स विचारण्यासाठी ट्रॅफिक पोलिस नसल्यामुळे बिनधास्तपणे अल्पवयीन मुले बाजारपेठेतुन गाडी चालवत असतात.अशावेळी एखादा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण?हा एक प्रश्न देखील उपस्थित होत आहे.त्यामुळे बाजारपेठ परिसरात ट्रॅफिक पोलिसाची नेमणूक केल्यास लहान मुलांना एकप्रकारे धाक बसून त्यांचे गाडी चालविण्याचे प्रमाण कमी होईल.त्यामुळे तळा बाजारपेठेत ट्रॅफिक पोलिसाची नेमणूक करण्याची मागणी स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गामधून करण्यात येत आहे.

Exit mobile version