शिवशाही बस नादुरुस्त झाल्याने वाहतूक ठप्प

| मळेघर | वार्ताहर |
पेणला जाताना मुंबई-गोवा हायवेवरील रेल्वे स्थानकासमोर असलेल्या वडखळ बाजूकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवर नव्याने तयार करण्यात आलेल्या पँटच्या त्या वळणावर शिवशाही बस नादुरुस्त झाल्याने दोन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला सदरचे वळण धोकादायक असल्याने दुसरा कोणता मार्ग काढता येईल का याचा विचार करून नॅशनल हायवे खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

पेण बाजूकडून वडखळ मार्गाकडे जाणार्‍या सर्व गाड्या यात सर्विस रोडवरून मार्गस्थ होत असता असल्याने वळणावर मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. खासगी बसेस तसेच एसटी बसेस या गाड्यांना थेट वळण घेता येत नसल्याने परत गाडी मागे घेऊन पुढे न्यावी लागते, त्यामुळे अपघाताचा ही धोका निर्माण झाला आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास अलिबागकडे जाणारी शिवशाही बस नेमकी त्याच वळणावर नादुरुस्त झाली. गाडीचे गिअर अडकल्याने गाडी पुढे जाऊ शकली नाही. यामुळे सर्व गाड्या अडकून राहिल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. एक-दीड तासानंतर सर्व गाड्या रिव्हर्स घेऊन दुसर्‍या मार्गे वळविल्याने वाहतूक कोंडी कमी झाली. दोन तासानंतर वाहतूक पोलीस जोशी व कवळे यांच्या प्रयत्नातून जेसीबीच्या साह्याने गाडी हटविण्यात आली. सदरच्या या वळणावर वारंवार अशा घटना होत असल्याने नॅशनल हायवे खात्याने व ठेकेदाराने विचारविनिमय करून एसी बसेसला थेट वळण घेता यावे यासाठी उपाययोजना करून योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version