महाड बाजारपेठेत वाहतूक कोंडी

दुकानदार गाळे सोडून रस्त्यावर; नागरिक हैराण

। महाड । प्रतिनिधी ।

महाड बाजारपेठ ही जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ असली तरी योग्य नियोजनाअभावी बाजारपेठेत होणार्‍या वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण झाले आहेत. शहरात असलेले दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते समोरील नाल्यावर आणि त्याच्याही पुढे रस्त्यावर आणून ठेवत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होउन पादचार्‍यांना त्रास होत आहे. याबाबत कायम तक्रारी करून देखील पालिका आणि पोलीस प्रशासन थातुरमातुर कारवाई करून सोडून देत आहेत. दुकानदार आणि कर्मचार्‍यांमधील आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई होत नाही, अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरु आहे.

महाड बाजारपेठेत तालुक्यासह पोलादपूर, माणगाव, मंडणगड, म्हसळा आणि गोरेगाव येथून नागरिक खरेदीसाठी येत असतात. शिवाय महाड हे ऐतिहासिक शहर असल्याने याठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक, शिवप्रेमी, भीमसैनिक दाखल होत असतात. गेली अनेक वर्षात शहराचा विस्तार देखील वाढू लागल्याने लोकसंख्येत वाढ झाली आहे. लोकसंख्या आणि बाजारपेठेतील गर्दी पाहता मुख्य बाजारपेठ रुंदीकरण झालेले नाही. यामुळे मुख्य बाजारपेठेत अवजड वाहन शिरताच अन्य वाहनांना अडथला निर्माण होउन वाहतूक कोंडी होत आहे.

मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण नगर रचना आणि विकास यामधील नियमात बसवला गेलेला नाही. यामुळे बाजारपेठ अरुंदच राहिली आहे. त्यातच अनेक दुकानदार आपला माल आणि विक्रीला आलेले सामान रस्त्यावर किंवा गटरच्यावर लावून ठेवत असल्याने पादचार्‍यांना त्रासदायक ठरत आहे. महाड शहरात ही अवस्था छ.शिवाजी चौक ते भगवानदास बेकरी मार्ग, पिंपळपार ते थेट जुना पोस्ट, शहरातील अंतर्गत रस्ते या रस्त्यांवर कायम दिसून येत आहे. मुख्य बाजारपेठ आणि अन्य जोड मार्गांवर रत्यालगत बसलेले शेतकरी, छोटे भाजी विक्रेते यांच्याकडून दुकानदार पायरीवर बसण्याचे पैसे मोजतात असे सांगण्यात येते. यामुळे पालिका देखील ठराविक रकमेची पावती बनवून पैसे वसुल करण्याचे काम करत आहेत.

Exit mobile version