माणगावात वाहतूक कोंडी; प्रवाशांची रखडपट्टी

महामार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी

| माणगाव | वार्ताहर |

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस लागलेल्या सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे येथील पर्यटक, नागरिक व त्यातच दिवाळीमुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकाच्या गर्दीचा फटका नागरिकांना बसला. त्यामुळे अनेक नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला.

दरवर्षीप्रमाणे यंदाचे वर्षीही मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या गर्दीमुळे महामार्गावर तासनतास प्रवाशांची रखडपट्टी झाली होती. माणगाव हे दक्षिण रायगडचे प्रवेशद्वार असल्याने तसेच महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या बाजारपेठेत मोठया प्रमाणात सकाळपासून संध्याकाळ पर्यंत वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे ही वाहतुकीची कोंडी माणगावकरांसह सर्वांचीच डोकेदुखी ठरली असून तिसऱ्या दिवशीही नागरिकांना या वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. कोकण व तळ कोकणात गेलेले नागरिक, पर्यटक तसेच समुद्र किनारी कोकण दर्शनासाठी गेलेले पर्यटक परतीच्या प्रवासाला निघाले असून तिसऱ्या दिवशीही माणगावात वाहतूक कोंडीची साडेसाती कायम राहिली आहे.

माणगाव बाजारपेठेतील पुणे-निजामपूर-माणगाव रस्ता, मोर्बा मार्ग तसेच महामार्गावर प्रवासी पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लांबच लांब लागल्या होत्या. माणगाव बायपास रस्त्याचे काम थांबल्यामुळे वाहतूक कोंडीवर आणखीनच भर पडली आहे. मात्र या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जलद गतीने झाल्यास माणगाव बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल, अशी पर्यटकांतून चर्चा होत आहे. शासनांनी हा प्रश्न लवकर निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, सलग लागलेल्या सुट्ट्यामुळे माणगाव शहरात एक ते दोन किलो मीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवार, रविवार तसेच सलग सुट्यांमुळे वाहतुक कोंडी नित्याची झाली आहे. दिवाळीमुळे मुंबई-पुण्यातील नागरिक कोकणात आले होते. याचा फटका नागरिकांना बसत असून नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागतो आहे.

दिवाळीच्या सुट्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक वाढली आहे. याचा परिणाम म्हणून माणगाव शहरातील वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. यामुळे स्थानिक प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे.

राहुल दसवते, स्थानिक नागरिक
Exit mobile version