। चिरनेर । प्रतिनिधी ।
जासई ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर अतिक्रमण करून अडथळा निर्माण करणार्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जासई हनुमान मंदिर ते हिम्मत नगरीकडे जाणार्या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
31 मे रोजी झालेल्या ग्रामसभेत या विषयावर वादळी चर्चा झाली. यावेळी सार्वजनिक रस्त्यावर केलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम काढून, ते बांधकाम सार्वजनिक रस्त्यापासून दोन फूट आतमध्ये घेऊन नव्याने करण्यात यावे. त्यासाठी आमची कोणतीच हरकत नाही, अशी चर्चा झाली. जासई हनुमान मंदिर ते हिम्मत नगरीकडे जाणार्या रस्त्यावर अतिक्रमण बांधकामाचा पंचनामा करण्यासाठी पंच कमिटी निवडण्यात आली आहे. यात रघुनाथ ठाकूर, यशवंत घरत, दत्तात्रेय घरत, शंकर घरत, वंदना पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रुप ग्रामपंचायत जासईने अतिक्रमण करणार्यास व पंच कमिटी पत्र देऊन अतिक्रमण खात्री पंचनामा करण्यात आला. अतिक्रमण असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे. यावेळी शासकीय अधिकारी उपस्थित होते.