दिवाळी सुट्यांमुळे पालीमध्ये वाहतुक कोंडी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

दिवाळी सुट्यांमुळे अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. दक्षिण रायगड, कोकणात येणारे पर्यटकही बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येत असल्याने पाली शहरात वाहतूक कोंडी होत आहे. अरुंद रस्ते, बेशिस्त वाहन पार्किंगमुळे दिवसें दिवस कोंडी वाढत असल्याने स्थानिक नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो.

पालीमध्ये येणारे भाविक, पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेल्स, पूजा साहित्य विक्री, तसेच अन्य व्यवसाय तेजीत आहेत. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले असून दुकाने व हॉटेल्स गजबजली आहेत. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भाविक स्वतःची वाहने घेऊन येतात तर काही खासगी बस करून येतात. त्यामुळे पालीतील रस्त्यावर कोंडी होत आहे. बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर विद्यालय, जुना एसटी थांबा, गांधी चौक, मारुती मंदिर, बाजारपेठ, हाटाळेश्वर चौक आदी ठिकाणी वाहतूक कोंडी होते.

पालीमधील रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. काही ठिकाणची अनधिकृत बांधकामेही हटवली आहे. महाकाली मंदिर व हनुमान मंदिर येथील रस्ता अधिक रुंद केला आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यास पाली शहरातील वाहतूक सुरळीत होईल. शिवाय भाविकांची वाहने व अवजड वाहतूक शहराबाहेरून होईल. यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे.

प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्ष, पाली

पालीतील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. शिवाय रस्त्यालगत अतिक्रमण, अवैध पार्किंग, अवजड वाहतुकीमुळे ही समस्या अधिक जटिल होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बाह्यवळण मार्ग लवकर तयार करणे प्रभावी उपाय आहे.

कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली
वाहनांची रेलचेल
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे, तेथे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुंबईवरून कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळेमार्गे माणगाववरून किंवा वाकणवरून पुढे जातात, तर कोकणाकडून येणारी वाहने माणगाववरून विळेमार्गे पाली, खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीमध्ये वाहनांची रेलचेल वाढत असून कोंडीत भर पडते.
Exit mobile version