| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-वडखळ महामार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून, शहाबाज ते पेझारी चेकपोस्टपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुटीच्या पार्श्वभूमीवर अलिबागकडे मोठ्या संख्येने पर्यटकांनी धाव घेतल्याने तसेच परतीच्या प्रवासाला लागलेल्या वाहनांमुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून येणारी तसेच अलिबागहून परतणारी वाहने कोंडीत अडकली आहेत.
पोयनाड आणि पेझारीसारख्या व्यापारी भागांतही वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने बाजारपेठ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनांचा वेग मंदावला असून, त्यामुळे कोंडी आणखी वाढली आहे. वाहतूक पोलिसांनी तातडीने गस्त वाढवून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासनाने महामार्ग दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पथके नेमण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. पर्यटकांची वाढती संख्या, अरुंद रस्ते आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे अलिबाग-वडखळ महामार्गावरील कोंडी ही दर सुटीला उद्भवणारी समस्या बनली असून नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अलिबाग-वडखळ मार्गावर वाहतूककोंडी
