परतीच्या प्रवासात भक्तांची ‘प्रवास’कोंडी

सुमारे सहा कि.मी. वाहनांच्या रांगा

। माणगाव । प्रतिनिधी ।

कोकणवासियांचे आराध्य दैवत असलेल्या गौरी गणपतीला नुकताच भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आपल्या मायभूमीतून कर्मभूमीकडे निघालेल्या गणेशभक्तांना परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीला सामोरे जावले लागले. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव ते लोणेरेदरम्यान सहा कि.मी. अंतरावर वाहतुकीच्या कोंडीशी सामना करावा लागल्याने गणेशभक्तांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे दिसून आले. महामार्गावर वाहतूक पोलीस, रायगड पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले असले तरी ही वाहतूक कोंडी सोडवताना त्यांची चांगलीच दमछाक झाली.

रायगड पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात माणगावात दरवर्षी होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग काढून तसेच माणगावात दुभाजक बसवून रंगीत तालीम केली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण व तळ कोकणात येणार्‍या गणेशभक्तांचा उत्साह पाहून माणगावात वाहतूक कोंडी होईल, असा अंदाज बांधला जात होता. त्याप्रमाणे माणगाव नगरपंचायत व पोलीस यांनी नियोजन करून गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील अडथळे, अनधिकृत पार्किंग, फेरीवाले व हातगाडीवाले यांना हटवून योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे माणगावात यंदा वाहतूक कोंडी झाली नाही. मात्र, पाच दिवसांच्या गौरी गणपती विसर्जनानंतर 6 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच तळ कोकणातून मुंबई, ठाणे, सूरतकडे परतणार्‍या गणेशभक्तांचा महापूर लोटल्याने अखेर वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला.

नियोजनाची ऐशीतैशी
वाहतूक कोंडी झाल्याने गणेशभक्तांना तासन्तास रस्त्यावरच अडकून पडावे लागले. रायगड पोलिसांनी इंदापूर, माणगाव, लोणेरे येथे वाहतूक पोलीस तसेच पोलीस होमगार्ड, दंगलकाबू नियंत्रण पथक तैनात केले होते. त्याचबरोबर अतिरिक्तही पोलीस कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असले तरी इंदापूर माणगाव, लोणेरे भागात अखेर वाहतूक कोंडीचे विघ्न गणेशभक्तांच्या आड आलेच. परिणामी, योग्य नियोजनाअभावी भक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याचा आरोप यावेळी प्रवाशांनी केला.

भक्तांसाठी पर्यायी मार्ग
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रायगड पोलिसांनी अनेक पर्यायी मार्ग केले होते. कोकणातून मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना महाड येथील पाचाड मार्गे बोरवाडी, निजामपूर तसेच माणगाव तालुक्यातील ढालघर फाटा येथून बोरवाडी-निजामपूर मार्गे कोलाड व खोपोलीकडे वाहने पर्यायी मार्गाने पाठविण्यात आली. सकाळपासूनच इंदापूर, माणगाव, लोणेरे या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहनांच्या रांगाच्या रांगा उभ्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

Exit mobile version