प्रवाशांचा खोळंबा
। मुंबई । प्रतिनिधी ।
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.18) सकाळपासून मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून चाकरमानी प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला आहे. तर ठिकठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या, सरकारी आणि स्थानिक सुट्ट्यांचा संगम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी जाण्यासाठी निघाले आहेत. अनेक प्रवासी आणि हौशी पर्यटक लोणावळा-खंडाळा परिसरात फिरण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे महामार्गावर अचानक वाहतूक वाढली आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे. वाहनांच्या लांब रांगा पाहून काही प्रवासी पर्यायी मार्गांकडे वळले आहेत.





