सिद्धेश्वर येथील विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।
राजिप शाळा सिद्धेश्वर येथील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. दिवाळी हा सण फटाके फोडून बच्चेकंपनी मोठ्या आनंदात साजरा करतात. फटाके फोडल्यामुळे ध्वनी, वायू, माती प्रदूषण होऊन त्याचा एकूण वातावरणावर तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. मानवी आरोग्यावर फटक्यामुळे तणाव येणे, थकवा येणे, एकाग्रता भंग पावणे असे दुष्परिणाम होतात.
अलीकडे रंगीत फटाक्याचे प्रमाण वाढले आहे. या फटाक्यामुळे हवेत जड धातू, नायट्रोजन डायॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड तसेच धुळीकणाचे प्रमाण वाढते. त्याचा श्वसनावर व मानवी आरोग्यावर परिणाम होतो. हवेत तरंगत्या धुळीकणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्याचे परिणाम मानवाच्या श्वसन क्रियेवर होताना दिसत आहेत. या परिणामांचे गांभीर्य विचारात घेऊन गोमाशी येथील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विद्यार्थी फटक्याऐवजी गोष्टी पुस्तके खरेदी करणार आहेत.
शाळेत विद्यार्थ्याना फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम व फटाकेमुक्त दिवाळीचे महत्व समजावून सांगितले. पर्यावरण स्नेही दीपावली, फटाकेमुक्त दीपावली साजरी करू. तसेच या दिवाळीत फटाके फोडणार नाही, त्याऐवजी पुस्तके विकत घेऊन वाचू, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







