प्रवासी नागरिक त्रस्त, मार्ग काढताना तारांबळ
| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील कोलाड बाजापेठेत बुधवारी (दि.25) नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्याकडे जाण्यासाठी चाकरमानी यांनी सकाळी पहाटे सहापासून गर्दी केली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे यातून मार्ग काढताना प्रवाशांची तारांबळ उडाली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
महामार्गावरील कोलाड (आंबेवाडी) बाजारपेठेत चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे येथील येणारी-जाणारी वाहतूक बायपास रस्त्यावरून वळविण्यात आली; परंतु नाताळची सुट्टी असल्यामुळे असंख्य चाकरमानी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दुचाकी, चारचाकी, एसटी बस, खासगी बसेस, तसेच मिळेल त्या इतर वाहनाने गोव्याकडे निघाले आहेत. यामध्ये भरीत भर म्हणून अपुरे रस्त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले असल्याचे दिसून आले.
मुंबई-गोवा महामार्गावरील पुई महिसदरा नदीच्या पुलापासून कोलाड नाक्यापर्यंत दोन किलोमीटरच्या अंतरावरील रस्ता हा सिंगल असल्यामुळे येथून वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असून, यामुळे नागरिकांची मार्ग काढताना तारांबळ उडाली. पुई महिसदरा नदी पुलापासून कोलाड तसेच तळवलीपर्यंत एका बाजूच्या मार्गाचे काम सुरु असून, येणारी-जाणारी वाहतूक दुसर्या बाजूने वळविण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.