माथेरानला वाहतूक कोंडीचे ग्रहण

पर्यटकांना फटका; पालिकेचे दुर्लक्ष

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानचा पर्यटन हंगाम सध्या बहरला आहे. परंतु, तीन दिवसाच्या मेगाब्लॉकने माथेरानचे पर्यटन कोलमडले असून सुट्टीच्या दिवशी नेरळ-माथेरान घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मध्य रेल्वेने घेतलेला तीन दिवसाचा मेगाब्लॉक हा माथेरानच्या पर्यटनासाठी फायदेशीर ठरला होता. मेगा ब्लॉकमुळे अनेकांनी सुट्टी घेतली होती. तर, अनेकांना सुट्टी दिली गेली होती. तसेच, मुंबईमध्ये उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी येथून जवळच असलेल्या माथेरानला पसंती दिली होती. परंतु, माथेरानला येताना अनेकांनी आपली स्वतःची वाहने आणणे पसंत केले होते. यामुळे नेरळ माथेरान घाटामध्ये वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने व त्यांचा पूर्ण कर्मचारी वर्ग येथल वाहतुक नियंत्रण करण्याकरता पूर्ण प्रयत्न करीत होते. तरीही स्थानिक टॅक्सी व पर्यटकांच्या गाड्यांमुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे स्थानिक टॅक्सी संघटनेने काही काळ टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नेरळ स्टेशनला पर्यटकांची तोबा गर्दी झाली होती. माथेरानमध्ये सुट्टीच्या दिवसांमध्ये नेहमीच नेरळ माथेरान घाटात व माथेरान वाहन तळामध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने पर्यटकांना तात्काळ थांबावे लागते. यावर उपाययोजना करण्यास शासन असमर्थ ठरत आहे. या वाहनतळाला लागूनच माथेरान नगरपालिकेचा भूखंड पडून आहे. जो नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आलेला आहे व ज्यावर वाहनतळ व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून येथील स्थानिक करत आहेत. परंतु, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच माथेरानच्या गर्दीच्या दिवशी पर्यटकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

Exit mobile version