पोलिसांकडून चिमुकल्यांना वाहतुकीचे धडे

| पनवेल | वार्ताहर |

वाहतूक नियमांची बालपणापासून माहिती व्हावी यासाठी खारघर वाहतूक शाखेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी धडे देण्यात आले. या वेळी हसत-खेळत चिमुकल्यांना पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती दिली.

खारघर सेक्टर-15 मधील लेस एनफंट्स इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या प्राचार्य डॉ. मलेका हबीब यांनी खारघर वाहतूक शाखेला पत्र पाठवून शालेय विद्यार्थांना वाहतूक नियमाचे धडे देण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेऊन खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष काणे यांनी बुधवारी घरकुल वसाहतीलगत असलेल्या सिग्नल यंत्रणेजवळ मुलांना एकत्र आणून वाहतुकीचे नियम, वाहतुकीच्या खुणा, हेल्मेट का वापरावे, दारू पिऊन गाडी का चालवू नये, रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी प्राधान्य कसे द्यावे, सिग्नलचा उपयोग, झेब्रा क्रॉसिंगचे फायदे अशा अनेक बाबी समजावून सांगितल्या. मुलांनीही या उपक्रमाला तेवढाच प्रतिसाद दिला

शालेय विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची पोलिसांनी सविस्तर उत्तरे दिली. विशेष म्हणजे सिग्नलचे तीन रंग का, कोणत्या रंगाचा काय अर्थ आहे, गाडी चालवायला काय लागते, दुचाकीवर किती जण बसू शकतात, याबाबत मुलांनी प्रश्न विचारले. त्याची त्यांना माहिती देण्यात आली. असे उपक्रम इतर शाळांनीही घ्यावेत.

संतोष काणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
खारघर वाहतूक शाखा
Exit mobile version