वाहतूक पोलिसांची जय्यत तयारी

महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज

| रायगड | प्रमोद जाधव |

गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल शिगेला पोहोचली आहे. बाप्पाच्या आगमनासह सजावट करण्यासाठी चाकरमानी गुरुवारपासून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. भक्तांचा प्रवास सुखकर व आरामदायी होण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा सज्ज झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गासह रायगड जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघातांचे आव्हान लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी होमगार्ड व अन्य सुरक्षा यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. शुक्रवारपासून वाहतूक पोलिसांचा महामार्गावर बंदोबस्त असणार असल्याची जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी दिली.

कृष्ण जन्माष्टमीनंतर गणरायाचे आगमन सोमवारी (दि.14) घरोघरी होणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणपणे साडेतीन लाख गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, रायगड जिल्ह्यात एक लाख पाच हजार 345 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणरायाचे आगमनाचे वेध लागले असून, मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, बोरीवलीसह विविध जिल्ह्यातील राज्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांची कोकणासह रायगड जिल्ह्यात येण्याची तयारी सुरु झाली आहे. काहीजण एसटी बसने, तर काही जण खासगी वाहनाने तर काही जण रेल्वेने त्यांच्या गावी दाखल होणार आहेत.
गणरायाचे आगमन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे येत्या दहा ते अकरा सप्टेंबरपासून चाकरमानी कोकणात दाखल होणार आहे. या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ राहणार आहे. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे चाकमान्यांचा सुखकर प्रवास व्हावा, त्यांना त्यांच्या निश्चित स्थळी वेळेवर पोहोचता यावे, यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांनी तयारी केली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी 65 वाहतूक पोलीस शुक्रवारपासून महामार्गावर बंदोबस्तासाठी असणार आहे. त्यांच्या मदतीला शंभर होमगार्डसह 60 पोलीस अधिकारी असणार आहेत. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपअधीक्षकांचा समावेश असणार आहे. पोलीस ठाण्यातील 211 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे.

वॉकीटॉकीसह बिनतारी संच
मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारपासून वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. माणगाव, नागोठणे, इंदापूरमध्ये वाहतूक कोंडींचा फटका कायमच बसत आला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी निजामपूरमार्गे बायपास पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा साधारणतः तीस टक्के फरक पडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाहतूक कोंडीसह एखादा अपघात रोखण्यासाठी आधुनिक यंत्राद्वारे समन्वय साधला जाणार आहे. त्यासाठी 27 वॉकीटॉकी, दहा बिनतारी संच उपलब्ध केले जाणार आहेत. यातून तात्काळ संपर्क साधून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर 10 क्रेन आणि 2 हायड्रा तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच तातडीच्या उपचारासाठी दहा रुग्णवाहिका सज्ज असणार असल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणासह रायगड जिल्ह्यात चाकरमानी विशेष म्हणजे गणेशभक्त दोन दिवसांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. महामार्गावरून त्यांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने तयारी केली आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचारी, होमगार्डचीदेखील मदत घेतली जाणार आहे. माणगाव, इंदापूरमध्ये होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे.

सचिन पवार, पोलीस निरीक्षक
जिल्हा वाहतूक शाखा, रायगड
Exit mobile version