शिवराज्याभिषेकासाठी वाहतुकीवर अंकुश

| रायगड | प्रतिनिधी |

श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून शुक्रवारी (दि.5) सायंकाळी चार ते शनिवारी (दि.6) रात्री दहा वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा नागोठणे ते कशेडी पर्यत तसेच माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतुकबंदी अधिसूचना जारी केली आहे.

या कार्यक्रमासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई वैगेरे ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने श्री शिवभक्त हे आपआपली वाहने घेवून येत असतात. या कार्यकमाच्या वेळी कोठे ही वाहतुक कोंडी निर्माण होवू नये व श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी जाहीर केली आहे. वाहतूक बंदी अधिसूचना ही दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका या वाहनांना लागू राहणार नाही.

Exit mobile version