जिल्हा प्रशासनाकडून आदेश
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड किल्ल्यावर 6 जून रोजी पार पडणाऱ्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याने कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, रायगड जिल्ह्यात 5 जून रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ते 6 जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या काळात सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
शासकीय यंत्रणांच्या वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात असते. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांचीदेखील प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असते. अशावेळी अपघात, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कार्यक्रमावेळी कुठेही वाहतूककोंडी निर्माण होऊ नये व शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त यांचा प्रवास सुखकर व्हाावा, यासाठी जिल्हाधिकारी जावळे वाहतूक बंदी जाहीर केली आहे. ही वाहतूक बंदी अधिसूचना ही दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जिवनावश्यक वस्तु वाहून नेणारी वाहने, अतिआवश्यक, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहीका या वाहनांना लागू राहणार नाही. या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
'या' मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
1. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग: वाकणफाटा, नागोठणे ते कशेडी दरम्यान या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.
2. माणगाव–निजामपूर मार्ग: माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावर अवजड वाहनांना परवानगी नाही.
3. महाड–नातेखिंड मार्ग: या मार्गे पाचाड ते रायगड किल्ला मार्गावरील सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता बंदी लागू करण्यात आली आहे.