खड्ड्यांमुळे मंदावला वाहतुकीचा वेग

पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरातील उड्डाणपुलांची पावसाळ्यात खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. जवळपास सर्वच पुलांवर लहान-मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने उसळण्याचे, नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे; तर काही ठिकाणी भरधाव वाहने गेल्यावर पुलाला हादरे बसत असल्याचेही चालकांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईचे प्रवेशद्वार असलेले पनवेल शहर वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. परिसरातून न्हावा-शेवा बंदर, पाताळगंगा, तळोजा औद्योगिक वसाहती, जेएनपीए, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग जातात. त्यामुळे माल वाहतुकीबरोबर प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. पनवेल परिसरामध्ये सिडको व रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 14 उड्डाणपूल बांधले आहेत; परंतु त्यांची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.


शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, म्हणून बांधलेल्या उड्डाणपुलासह रस्त्यांची पावसामुळे अक्षरश: चाळण झाली आहे. तीच परिस्थिती पनवेल व नवीन पनवेलला जोडणार्‍या रेल्वे मार्गावरील पुलांची आहे. नवीन पनवेलचा खड्डेमय पूल कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचे ठिकाण बनलेला आहे. पनवेलमधील सामाजिक कार्यकर्ते आनंद भंडारी यांनी याविषयी सिडकोकडे पाठपुरावा केला आहे.

कळंबोली फूडलॅन्ड व नावडा येथील रेल्वे क्रॉसिंगच्या पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्याचप्रमाणे पनवेल-मुंब्रा महामार्गावर कळंबोली येथील उड्डाणपुलाची दुरवस्था झाली आहे. अवजड वाहनांच्या अपघाताचेही प्रमाण वाढले असून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

Exit mobile version