| पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल उड्डाणपुलावर मोठ मोठे खड्डे पडल्याने प्रवास करताना नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
नवीन पनवेल ते पनवेलला जोडणार्या उड्डाणपुलावर चढताना व गाड्या उतरताना खड्ड्यांची रांगोळी सुरू झाली आहे. त्यामुळे खाली वर जाताना तीन ते चार सिग्नल पडतात. यात इंधन देखील वाया जाते व नागरिकांचा वेळ देखील जातो. याकडे स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथे खड्डे पडून खोळंबा होतो. मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा माथेरान रोड येथील सुकापूर-भगतवाडी येथे पडलेल्या खड्ड्यांनी प्रवासी पुरते हैराण झाले आहेत. चिपळे येथील रस्त्यावर देखील खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालवायचे कुठून असा प्रश्न उपस्थित होतो.
भगतवाडी-चिपळे येथील सर्व रस्ताच खड्ड्यांनी भरलेला असल्यामुळे वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. खड्ड्यात अनेकदा वाहने आपटल्यामुळे पाठीमागील वाहन येऊन पुढील वाहनाला धडकते. व त्यात अपघात होतो. शासन अद्याप जागे झालेले नाही. दिवसातून दहा ते बारा वेळा प्रवासी घेऊन जाणारे इको व तीन चाकी रिक्षा चालक या खड्ड्यांना पुरते वैतागले आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावर नवीन पनवेल उड्डाणपूल, भगतवाडी आणि चिपळे येथील खड्डे प्रशासन भरणार का असा सवाल रिक्षाचालक, इको चालकांनी विचारला आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होतो.
संपूर्ण उड्डाणपूलावर वाहनांची मोठी रांग लागते. प्रशासनाला काहीही देणे घेणे नाही. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची रेलचेल आहे. गाडीचा टॅक्स घेऊन सुद्धा जर रस्ते चांगले मिळत नसतील तर काय फायदा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. येथील खड्ड्यांच्या विरोधात नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्रा आहेत.