। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिस येथील महालक्ष्मी रुबी बिल्डिंगमध्ये एका 13 वर्षीय मुलाचा राहत्या घरी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रज्वल रणजीत पाटील असे मृत मुलाचे नाव आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी मोहोपाडा येथील पल्स हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार रिस येथील निरामय हॉस्पिटल आणि पुढे चौक येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी प्रज्वलला मृत घोषित केले. प्रज्वलचे वडील रणजीत पाटील हे पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील व्हॅनबेरी कंपनीत नोकरीस आहेत. अवघ्या 13 वर्षांच्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर पुढील तपास करीत आहेत.
मुलांच्या भावनिक आरोग्याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे
अल्पवयीन मुलांच्या वर्तनातील बदल, तणाव किंवा भावनिक अडचणींकडे पालक, शिक्षक आणि कुटुंबीयांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांना कोणतीही अडचण किंवा चिंता असल्यास त्यांच्याशी शांतपणे संवाद साधून त्यांना विश्वासात घेणे. मुलांनीही अडचणीच्या प्रसंगी पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलावे, हा संदेश या दुर्दैवी घटनेतून पुढे येत आहे.
